नोव्हेंबर २०२० मधील दिवाळीच्या कालावधीत पुणे येथील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सौ. सारिका मुदकुडे, सिंहगड रस्ता, पुणे.

१. दिवाळीच्या दिवसांतही प्रतिदिन ‘गुरुलीला सत्संग आणि व्यष्टी साधनेचा आढावा’ चालू असल्यामुळे ‘केवळ परात्पर गुरुमाऊलींच्या अनुसंधानात राहिल्यानेच खरा आनंद मिळणार आहे’, हे साधिकेला अनुभवता येणे

‘नोव्हेंबर २०२० मध्ये दिवाळी होती. ‘दिवाळी आध्यात्मिक स्तरावर कशी अनुभवायची ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. ‘गुरुलीला सत्संगा’त सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेवांच्या स्मरणात कसे रहायचे ?’, हे लक्षात आले. (पुणे जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, यांसाठी सौ. मनीषा पाठक या साधिका प्रतिदिन ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. ‘सौ. मनीषाताईंनी सांगितलेल्या सूत्रांवर कशा प्रकारे प्रयत्न केले ?’, हे साधक नंतरच्या सत्संगात सांगतात.) पूर्वी माझ्यातील ‘मनाप्रमाणे वागणे आणि सवलत घेणे’ या स्वभावदोषांमुळे सणाच्या दिवशी मी मायेत गुरफटले जायचे अन् पुन्हा साधनेची घडी बसवायला मला पुष्कळ दिवस लागायचे. या वर्षी मात्र दिवाळीच्या दिवसांतही प्रतिदिन ‘गुरुलीला सत्संग आणि व्यष्टी साधनेचा आढावा’ चालू असल्यामुळे परात्पर गुरुमाऊलींना भरभरून अनुभवता आले. ‘केवळ परात्पर गुरुमाऊलींच्या अनुसंधानात राहिल्यानेच खरा आनंद मिळणार आहे’, हे या वर्षीच्या दिवाळीत मला अनुभवता आले.

२. ‘सनातनच्या आकाशकंदिलाच्या माध्यमातून खोलीत प्रचंड प्रकाश पसरला आहे’, असे जाणवणे

या वर्षी घरात सनातनचा आकाशकंदिल लावला, तरी यजमान काहीही बोलले नाहीत. ‘आकाशकंदिलाच्या माध्यमातून खोलीत प्रचंड प्रकाश पसरला आहे’, असे मला जाणवले.’

सौ. अस्मिता आवटी, सिंहगड रस्ता, पुणे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ श्री महालक्ष्मीच्या रूपात आल्या आहेत’, असा भाव टिकून रहाणे

‘१४.११.२०२० या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझा ‘साक्षात् श्री गुरुमाऊली घरी आली आहे आणि ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ श्री महालक्ष्मीच्या रूपात आल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या पूजनाची संधी मला दिली आहे’, असा भाव दिवसभर टिकून होता. संध्याकाळी केलेल्या पूजेच्या वेळी ‘क्षीरसागरामध्ये श्री महाविष्णूच्या चरणांशी बसलेल्या श्री महालक्ष्मीचे पूजन केले आहे आणि खोलीत क्षीरसागरातील निळा प्रकाश पसरला आहे’, असे जाणवत होते.’ (लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (३.४.२०२१))

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक