ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

आजपासून वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. सध्याच्या मानवांत सात्त्विकतेचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यांच्यात हे राज्य चालवण्याची क्षमता नाही; म्हणून ईश्वराने उच्च लोकांतून काही सहस्र दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. ही दैवी बालके उपजतच सात्त्विक असल्यामुळे त्यांच्यामध्ये ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता आहे. या दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्‍या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता यांतून ‘ही दैवी बालकेच ईश्वरी राज्य चालवू शकतील’, हे लक्षात येईल. त्यांच्या सहवासात असतांना, त्यांना पाहिल्यावर किंवा त्यांचे बोलणे ऐकल्यावर ऐकणार्‍या साधकांचा भाव जागृत होतो. त्यांच्याकडून आनंद आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होत असते. सर्व वाचकांना हे शिकता येण्यासाठी आजपासून पुढे प्रत्येक रविवारी दैवी बालकांची लेखमाला चालू करण्यात येणार आहे. 

 

सनातन संस्थेतील दैवी बालके केवळ ‘पंडित’ नाहीत, तर ‘प्रगल्भ’ साधक आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातन संस्थेत काही दैवी बालके आहेत. त्यांचे बोलणे आध्यात्मिक स्तरावरील असते. आध्यात्मिक विषयावर बोलतांना त्यांच्या बोलण्यात ‘सगुण-निर्गुण’, ‘आनंद, चैतन्य, शांती’ यांसारखे शब्द असतात. असे शब्द बोलण्यापूर्वी त्यांना थांबून विचार करावा लागत नाही. त्यांचे बोलणे ओघवते असते. ‘ते ऐकत रहावे’, असे वाटते. सर्वसाधारण व्यक्तीच्या दृष्टीकोनातून एखाद्याच्या बोलण्यात असे शब्द येण्यासाठी त्याला नियमित या विषयांशी संबंधित असणे आवश्यक असते. त्या विषयाचा गाढा अभ्यास केला की, ते विषय बुद्धीने कळतात आणि आकलन होतात. त्यानंतर ‘पांडित्य’ येऊन तसे बोलणे होते; परंतु हे बालसाधक केवळ ८ ते १५ वर्षे या वयोगटातील आहेत. त्यांनी ग्रंथांचा गाढा अभ्यास काय; पण वाचनही कधीच केलेले नाही. त्यामुळे त्यांची ही परिभाषा त्यांच्या गेल्या जन्मीच्या साधनेमुळे त्यांच्यात निर्माण झालेली प्रगल्भता दर्शवते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१०.२०२१)

आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी उत्कट भाव असलेली ६१ टक्के पातळीची दैवी बालिका कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) हिने केलेले भावचिंतन !

बहुतांश दैवी बालके अंतर्मुख असल्यामुळे ती स्वत:च्या मनात येणार्‍या विचारांचे सखोल चिंतन करतात. ते त्यांची विचारप्रक्रिया सहजतेने मांडू शकतात. ‘माझे योग्य आहे का ?’, असा विचारही त्यांच्या मनात नसतो. एका सत्संगामध्ये कु. अपाला औंधकर हिच्या मनात आलेले विचार आणि तिची विचारप्रक्रिया याविषयी आपण या लेखात पाहूया.

कु. अपाला औंधकर

१. ‘क्षमायाचना आणि आत्मनिवेदन करणे, प्रायश्चित्त घेणे आणि समष्टीत चुका सांगणे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना दिलेले ‘चार्जर’ असून यामुळे ते ‘साधक-फूल’ गुरुचरणी अर्पण होत असणे

‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व पटवून देतात. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आपण आपल्या भ्रमणभाषच्या ‘बॅटरी’तील शक्ती न्यून झाल्यावर तो भारित करायला (‘चार्जिंग’ला) लावतो. साधकाची ‘बॅटरी’ त्याच्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेनुसार उतरते. ‘साधकांसाठी क्षमायाचना आणि आत्मनिवेदन करणे, प्रायश्चित्त घेणे आणि समष्टीमध्ये चुका सांगणे’, हे गुरुदेवांनी दिलेले ‘चार्जर’ आहेत. त्यामुळे साधकामध्ये अंतर्मुखता निर्माण होऊन साधकाची भ्रमणभाषप्रमाणेच ‘बॅटरी चार्ज’ होते. साधकाचा ‘चार्जर’ स्वतः नारायणस्वरूप गुरुदेवांनी बनवला असून तो दिव्य आहे. आपण व्यष्टी साधनेचे प्रयत्न केले नाहीत, तरच तो बंद (डिसर्चाज) होतो; पण वरीलप्रमाणे साधनेचे प्रयत्न केले, तर त्याचे ‘चार्जिंग’ वाढत जाऊन ते ‘साधक-फूल’ गुरुचरणी अर्पण होते.

२. परात्पर गुरुदेवांनी प्रयोगासाठी भांड्यातील पाण्यात त्यांची बोटे बुडवणे आणि साधकांनी मिठाच्या पाण्यात पाय बुडवणे यांतील भेद

२ अ. सात्त्विक व्यक्तीने बोटे पाण्यात घातल्यावर सात्त्विक आणि उच्च स्तराची अनुभूती येणे; म्हणजे रंगाच्या माध्यमातून ते तत्त्व कार्य करणे : पंचतत्त्वांच्या संदर्भात प्रयोग करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी एका भांड्यातील पाण्यात तर्जनी बुडवल्यावर पाण्याचा रंग गुलाबी होतो. त्यांनी तर्जनी आणि मध्यमा पाण्यात घातल्यावर पाण्याचा रंग गडद होतो. त्यांनी तर्जनी, मध्यमा आणि अनामिका पाण्यात घातल्यावर रंग अजून गडद होतो आणि तर्जनी, मध्यमा, अनामिका अन् करंगळी ही चारही बोटे पाण्यात घातल्यावर पाण्याचा रंग पूर्णतः गुलाबी होतो. या प्रयोगाचे शास्त्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे की, ‘प्रत्येक बोटातील पंचतत्त्वांतील तेजतत्वाशी संबंधित तत्त्व पाण्यात येते. ते रंगाच्या माध्यमातून दिसते. सात्त्विक व्यक्तीने बोटे पाण्यात घातल्यावर सात्त्विक आणि उच्च स्तराची अनुभूती येते, म्हणजे रंगाच्या माध्यमातून ते तत्त्व दिसते.’ (प्रीती हा परात्पर गुरु डॉक्टरांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे पाण्यात त्यांचे तत्त्व, म्हणजे प्रीतीचा निर्देशक गुलाबी रंग दिसतो. – संकलक)

२ आ. ‘शरिरातील तत्त्व रंगांच्या माध्यमातून दिसू शकते’, हे लक्षात येणे : या वेळी मला गुरुदेवांच्या कृपेने लक्षात आले, ‘खडे मीठ घातलेल्या पाण्यात पाय ठेवून नामजप करतांना मिठातील शक्तीमुळे आपल्या शरिरातील काळी शक्ती त्या पाण्यात उतरते. पाण्यातून पाय बाहेर काढल्यावर पाण्याचा रंग पाहिला, तर ते पाणी काळसर झालेले दिसून येते.’ गुरुदेवांनी दाखवलेल्या प्रयोगामधून ‘आपल्या शरिरातील तत्त्व रंगांच्या माध्यमातून आपल्याला दिसू शकते’, हे लक्षात आले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले ब्रह्मांडाचे नायक असणे

३ अ. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील कृपा पाहून पुरुषसूक्तातील ओळी आठवणे आणि त्याप्रमाणेच त्यांना अनुभवतांना कृतज्ञताभाव जागृत होणे : ‘जगभरातील लक्षावधी साधकांच्या हाकेला, त्यांच्या संकटसमयी धावून जाणारे आणि साधकांना अनुभूती देणारे ते परब्रह्मस्वरूप गुरुदेव आहेत. ‘ते सर्वांचे कसे काय ऐकू शकतात ?’, याविषयी विचार करत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सूक्ष्मातून पुढील उत्तर दिले. – ‘पुरुषसूक्त’ हे श्रीविष्णूवर आधारित असणारे सूक्त आहे. त्यामधील ‘सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् । स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् ।’ (पुरुषसूक्त, ऋचा १) म्हणजे ‘तो सहस्रावधी डोकी, सहस्रावधी डोळे आणि सहस्रावधी पाय असलेल्या संपूर्ण पृथ्वीला व्यापून अजून १० बोटे शेष राहिलेल्या पुरुषाप्रमाणे (परमात्म्याप्रमाणे) आहे.’

३ आ. परात्पर गुरुदेवांच्या दिव्य स्वरूपाला सहस्र शीर्षे असून तीच सहस्र शीर्षे प्रत्येक साधकाकडे कृपाकटाक्ष टाकत असणे आणि प्रत्येक जिवात तेच असणे : याचा भावार्थ मी प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) डोळ्यांसमोर आणून अनुभवत होते. त्या वेळी मला जाणवले, ‘गुरुदेव हे साक्षात् श्रीविष्णुस्वरूप आहेत. त्यांच्या दिव्य स्वरूपाला सहस्र शीर्षे आहेत. त्यामुळे प्रत्येक साधकाचे विचार त्या प्रत्येक शीर्षात जातात. प्रत्येक शीर्ष प्रत्येक साधकाकडे कृपाकटाक्ष टाकत आहे आणि सहस्र चरण प्रत्येक साधकाच्या हाकेला धावून येत आहेत.’

वरीलप्रमाणे भाव ठेवल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘माझे गुरु हे सार्‍या ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि तेच प्रकृती आहेत आणि त्या प्रकृतीत विराजलेल्या प्रत्येक जिवात तेच आहेत’, असा विचार येऊन माझी अखंड कृतज्ञता व्यक्त होऊ लागली.

 ४. स्वतःकडे कर्तेपणा न घेता सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘हे तुमच्या कृपेमुळेच झाले. गुरुदेवा, तुम्हीच माझ्याकडून करवून घेतले’, असे म्हटल्यावर परात्पर गुरु डॉक्टर लगेच त्याचा कर्तेपणा ईश्वराला देतात आणि शिकण्याच्या स्थितीत रहातात.

५. ‘साधकाला त्याच्या साधनामार्गानुसार साधना करता येऊन ईश्वरप्राप्ती व्हावी’, असे परात्पर गुरुदेवांना वाटणे आणि त्यांनीच निर्गुणातून साधकांना साहाय्य करणे

एकदा एक साधक परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाला, ‘‘हे गुरुदेवा, मी शेतात सेवा करत असतांना तुम्हीच ती सेवा माझ्याकडून पूर्ण करवून घेतलीत’, अशी मला अनुभूती आली.’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मला शेती कुठे येते ? ते ईश्वरानेच करवून घेतले.’’ या प्रसंगातून गुरुदेवांनी शिकवले, ‘गुरुदेव स्वतः ईश्वर असून ते कधीच कर्तेपणा घेत नाहीत. प्रत्येकाच्या साधनामार्गानुसार त्याला साधना करता येऊन ईश्वरप्राप्ती व्हावी’, असे त्यांना वाटते आणि तेच आपल्याला निर्गुणातून साहाय्य करत असतात.’

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०२१)

संतांचा प्रत्येक सत्संग हा अनमोल मोत्यासमान आहे !

संतांचा सत्संग हा अनमोल मोत्यासमान आहे. एकेक मोती वेचत मी गुरुदेवांच्या चरणी एक दिव्य ‘मोत्यांची माळ’ भावस्थितीत जाऊन सूक्ष्मातून अर्पण केली. त्या वेळी गुरुदेवांनीच मला एक कविता सुचवली आणि माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

देवा, विसर पडून स्वतःचा, होवो सत्वरी तव चरणप्राप्ती ।
मोत्यासम अमूल्य, असे भेट संतांची ।
माझ्यासारख्या पामरांना परमानंद देण्याची ।। १ ।।

देवा, भगवंता, हे परब्रह्मा, ओळखले मनीचे तूच सर्वकाही ।
परि ते शब्दांत व्यक्त कसे करू, तुलाच ठाऊक हेही ।। २ ।।

प्रत्येक क्षणाचा लाभ करूनी, राहो मनी अखंड शरणागती ।
देवा विसर पडून स्वतःचा, होवो सत्वरी तव चरणप्राप्ती ।। ३ ।।

मोत्यांची ही दिव्य माळ अर्पण करी ही ‘अपाला’ ।
आनंद देण्यासाठी वाटे, जणू भगवंतची धावूनी आला ।। ४ ।।

– कु. अपाला औंधकर, गोवा (१०.१०.२०२१)


‘दिवाळीला घरी न जाता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत रहाण्यातच दिवाळीचा खरा परमानंद आहे’, असा भाव असणार्‍या दैवी बालसाधिका !

दिवाळी हा आनंदाचा सण ! सनातनच्या रामनाथी, गोवा आश्रमातील काही दैवी बालकांची ‘दिवाळीला घरी जायचे कि आश्रमात रहायचे ?’, या संदर्भात मनाची जी विचारप्रक्रिया झाली, ही त्यांना ईश्वराच्या समीप नेणारी असल्याने परात्पर गुरुदेवांना पुष्कळ आवडली. बालसाधकांच्या विचारप्रक्रिया येथे दिल्या आहेत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभवण्यातच दिवाळीएवढा परमानंद आहे ! – कु. सायली देशपांडे

कु. सायली देशपांडे

‘रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) यांचे वास्तव्य असल्याने ते आम्हा बालसाधकांना प्रतिदिन सूक्ष्मातून भेटतात. आश्रमात त्यांचे सतत अस्तित्व जाणवते. आमच्यासाठी हीच खरी दिवाळी आहे. दिवाळी वर्षातून एकदाच येते; परंतु प्रतिदिन देवाला अनुभवण्यात दिवाळीएवढाच परमानंद आहे !’ – कु. सायली देशपांडे (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

२. ‘रामनाथी आश्रम म्हणजे साक्षात् महाविष्णूचे वैकुंठधाम असून येथे मिळणारा आनंद दिवाळीला घरी जाण्याने मिळू शकत नाही ! – कु. वेदिका दहातोंडे

कु. वेदिका दहातोंडे

‘साधू संत येती घरा । तोची दिवाळी दसरा ।’, असे मराठीत सुवचन आहे. आपण रामनाथी आश्रमात, म्हणजे साक्षात् वैकुंठधामात आहोत. इथेच सर्व संत आणि प्रत्यक्ष महाविष्णुसुद्धा (परात्पर गुरु डॉ. आठवले) निवास करतात. इथे प्रतिदिन मिळणारा आनंद दिवाळीला घरी जाण्याने मिळू शकत नाही !’ – कु. वेदिका दहातोंडे (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के)

३. साक्षात महाविष्णूच्या घरी दिवाळी सण साजरा करण्यातच आनंद आहे ! – कु. शिवानी लुक्क

कु. शिवानी लुक्क

‘दिवाळी सणाला घरी जाण्यापेक्षा साक्षात् महाविष्णूच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) घरी दिवाळी सण साजरा करण्यात किती आनंद आहे’, याची आपण कल्पनाच करू शकत नाही !’ – कु. शिवानी लुक्क (वय १३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५३ टक्के)

(२८.१०.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक