माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी !

अनिल देशमुख

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयाने आर्थिक घोटाळ्याच्या (मनी लाँड्रिंग) प्रकरणी अधिक चौकशीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (‘ईडी’ची) कोठडी सुनावली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. यासाठी त्यांची १२ घंट्यांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती.

अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलेल्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. ‘देशमुख यांना आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पी.एम्.एल्.ए.) अटक करण्यात आली आहे’, असे अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. देशमुख यांनी चौकशीच्या काळात प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे देशमुख यांना अटक करून २ नोव्हेंबरला न्यायालयात उपस्थित करून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, अशी माहिती संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी दिली.

‘कोठडीत घरचे अन्न आणि औषधे मिळावीत, तसेच चौकशीच्या वेळी माझ्या अधिवक्त्यांना उपस्थित रहाता यावे’, यासाठी अनिल देशमुख यांनी अर्ज केला होता. त्याला न्यायालयाने अनुमती दिली आहे.