असे भ्रष्ट पदाधिकारी असलेले संचालक मंडळ बरखास्त करून त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित ! – संपादक
पुणे – रोख आणि ‘बेअरर’ धनादेश देऊन सभासदांना नियमबाह्य कर्जवाटप करणे, ठेवी आणि कर्ज वसुलीची रक्कम रोखीने स्वीकारणे, रोखीने व्यवहार करून प्राप्तीकर कायद्याचे उल्लंघन करून कराचे लेखापरीक्षण करतांना शासनाची फसवणूक करणे, संस्थेची रोख रक्कम वापरून अवैधरित्या भूमीची खरेदी करणे, तसेच त्याचे छोटे भूखंड करून रोखीने अवैधरित्या विकणे या गैरप्रकारांसाठी ‘दि पुणे पोस्टस् अँड टेलिकॉम सहकारी पतसंस्थे’चे २३ संचालक आणि पदाधिकारी यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अनेक कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संस्थेचे सभासद गणेश तिखे यांनी पतसंस्थेच्या संपूर्ण संचालक मंडळाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक पैशांचा अपहार केल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा अर्ज न्यायालयात केला होता. हा अर्ज मान्य करत एम्.पी.आय.डी. (मुंबई शहर आणि नागरी सत्र न्यायालय) न्यायालयाचे न्यायाधीश एस्.एस्. गोसावी यांनी विश्रामबाग पोलिसांना संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला.