हिंदु विधीज्ञ परिषदेची सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांकडे तक्रार
कोल्हापूर, १ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु विधीज्ञ परिषदेचे काही सदस्य काही काळापूर्वी विशाळगडावर गेले असता तेथे एक फलक त्यांना दिसला. या फलकावर ‘मा. सत्यजित पाटील (आबा) सरूडकर यांच्या २५१५ या योजनेतून कामाचे नाव – किल्ले विशाळगड येथे लाश रोजाकडे आणि आहिल्यादेवीच्या समाधीस्थळाकडे जाणारा रस्ता करणे. २० लाख रुपये निधी संमत करून वचनपूर्ती’, असा मजकूर लिहिलेला फलक दिसला. प्रत्यक्षात येथे रस्ताच नाही. याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारांर्गत माहिती मागवली असता असे कोणतेही काम झाले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवले. याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २७ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक बांधकाम अभियंत्याकडे तक्रार करून ‘किल्ले विशाळगड येथे न बांधलेल्या रस्त्याचे ‘२५१५ योजनेतून बांधलेला रस्ता’ या लागलेल्या फलकाचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.
हिंदु विधीज्ञ परिषदेने सार्वजनिक बांधकाम अभियंत्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,
१. हा रस्ता झालेला नसतांनाही खोटा आणि चुकीचा फलक लावण्यात आलाच कसा ?
२. खोटा आणि चुकीचा फलक लावणारे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या आपण काय कारवाई केली ?
३. खोटा आणि चुकीचा फलक आपल्या अधिकार्यांना कसा लावू दिला ?
४. आपले काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी संगनमताने २० लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे का ? अशी शंका या निमित्ताने निश्चित उपस्थित होते.
५. ज्या छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य रयतेला न्याय देण्यासाठी, तसेच भ्रष्टाचार आणि अन्याय रोखण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर असे प्रकार घडणे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आपण या प्रकाराची गंभीरपणे नोंद घेऊन यात दोषी असणारे, तसेच चुकीचे फलक लावून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणारे अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि याविषयीची माहिती आम्हाला द्यावी.