देशाची राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी शत्रूदेशातील समाजाला लक्ष्य करणे हा शाश्वत पर्याय ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

भविष्यातील युद्धनीती नागरिक केंद्रित असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन !

बचावात्मक भूमिकेत राहण्यापेक्षा आक्रमणाचा पर्याय भारत कधी निवडणार ? – संपादक

अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

पुणे – कोणत्याही देशाची राजकीय आणि सैन्य यांच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी युद्ध हे परवडणारे माध्यम राहिलेले नाही. शत्रू देशातील समाजाला लक्ष्य करणे हा स्वस्त आणि शाश्वत पर्याय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये याचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’च्या (‘पी.आय.सी.’च्या) वतीने आपत्ती आणि कोरोना संसर्गाच्या काळातील ‘राष्ट्रीय सुरक्षा सज्जता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ माध्यमातून आयोजित केलेल्या सहाव्या ‘पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी’ या परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

या वेळी पी.आय.सी.चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, पी.आय.सी.चे विश्वस्त आणि ‘सेंटर फॉर ऍडव्हान्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’चे संचालक (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले, परिषदेचे निमंत्रक (निवृत्त) लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित डोवाल पुढे म्हणाले…

१. नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याने आर्थिक प्रगती आणि राजकीय स्थैर्य यांना धोका निर्माण होतो. पर्यावरणीय संकटांचेही घातक परिणाम होतात. लोकसंख्येचे केंद्रीकरण झाल्यानेही समस्या निर्माण होतात. याचा परिणाम राष्ट्रीय सुरक्षेवर होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये माहितीची देवाण-घेवाण, तंत्रज्ञान हस्तांतर आणि समन्वय हवा.

२. सर्वसामान्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेची भावना यांवर आक्रमण केल्यास त्याचा परिणाम देशाच्या इच्छाशक्तीवर होतो. नागरिकांचा सरकारवरील विश्वास न्यून होऊन अंतर्गत स्थैर्याला बाधा पोचते. त्यामुळे भविष्यातील युद्धनीती ही भूराजकीय केंद्रित असण्यापेक्षा नागरिक केंद्रित असेल.

‘सार्वजनिक आरोग्यावरील संकटांना सामोरे जाण्यासाठी आधीपासूनच सर्वंकष कृती आराखडा सिद्ध करण्याची आवश्यकता आहे’, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. सौम्या स्वामिनाथन् यांनी व्यक्त केले.