राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींच्या प्रवेशाचे निःपक्षपणे स्वागत करा ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे छात्रांना मार्गदर्शन करतांना

पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये आता मुलींनाही प्रवेश दिला जाणार असल्याने त्यांचे निःपक्षपणे स्वागत करा. भेदभाव न करता मुलांप्रमाणे मुलींचे प्रशिक्षण असेल. मुलींच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (‘एन्.डी.ए.’मध्ये) सुविधा उभारण्याचे काम चालू असून त्यांच्या प्रशिक्षणाला लवकरच प्रारंभ होईल, असे प्रतिपादन सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. प्रबोधिनीच्या १४१ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा २९ ऑक्टोबर या दिवशी खेत्रपाल मैदानावर पार पडला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून छात्रांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

‘पुरुष छात्रांप्रमाणे महिलाही चांगली कामगिरी करतील’, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. ‘महिलांच्या प्रवेशामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने प्रबोधिनीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे’, असेही ते म्हणाले.