निवडणुकीच्या धामधुमीत यंदा पणजी येथे नरकासुराच्या प्रतिमांमध्ये वाढ
|
पणजी – गतवर्षी कोरोना महामारीमुळे काही प्रमाणात निर्बंध असल्याने नरकासुराच्या प्रतिमा अल्प प्रमाणात करण्यात आल्या होत्या; मात्र यंदा कोरोना महामारीचा कहर काहीशा प्रमाणात उणावल्याने आणि विधानसभा निवडणुकीची धामधूम असल्याने यंदा पणजी मतदारसंघात नरकासुर प्रतिमांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच प्रतिमांमध्ये वाढ होण्यासमवेतच प्रतिमांची उंची वाढवलेली दिसत आहे. ५ ते ३० फुटांपर्यंत अक्राळविक्राळ नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यात येत आहेत. प्रतिमा सिद्ध करणार्यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य मिळत आहे. (‘नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यासाठी वापरण्यात येणारा पैसा गोरगरिबांना द्या !’, असे प्रबोधन तथाकथित पुरो(अधो)गामी आणि अंनिसवाले का करत नाहीत ? हेच लोक महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक न करता दूध गरिबांना द्या’, ‘होळीची पुरणपोळी दान करा’, अशी अशास्त्रीय आवाहने करतात; पण नरकासुराच्या प्रतिमा बनवल्या जाऊ नयेत, यासाठी विरोध किंवा प्रबोधन काही करत नाहीत ! – संपादक)
नरकासुराची प्रतिमा बनवणारे आर्थिक साहाय्यासाठी लोकप्रतिनिधींकडे येत आहेत. प्रतिमा सिद्ध करणार्यांना प्रत्येकी ५० सहस्र ते ५ लक्ष रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जात असल्याचे समजते. हे आर्थिक साहाय्य पुढे खाणे-पिणे, आतषबाजी, डिजे संगीताची व्यवस्था करणे, विजेची व्यवस्था करणे, प्रतिमा बनवण्यासाठी येणारा खर्च आदी गोष्टींसाठी वापरले जाते. काही ठिकणी नरकासुराची प्रतिमा करणार्यांसाठी देणगी घेतलेल्यांच्या नावाची धारिका बनवण्यात आल्याचे समजते. पणजी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात अंदाजे ३० ते ४० नरकासुराच्या प्रतिमा उभारल्या जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपल्या युवा मतदारांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.