सांगली येथे जिल्हा प्रशासनास हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
सांगली, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष देसाई, गिरीश पुजारी, नारायण मेणकर उपस्थित होते.
प्रदूषणकारी, तसेच देवतांची विटंबना करणार्या फटाक्यांवर बंदी घाला !
फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट निवळत आहे, तसेच पुन्हा तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणू हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर आक्रमण करत असल्याचे दिसून येते. याचसमवेत फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांमुळे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा सर्रास अवमान होतो. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात, तरी प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्या फटाक्यांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदनही या वेळी देण्यात आले.