दीपावलीच्या वेळी सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये गोपूजन करण्याचा कर्नाटक सरकारचा आदेश !

कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता सरकारने सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्याचाही निर्णय घ्यावा, असे हिंदूंना वाटते ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

बेंगळुरू (कर्नाटक) – दीपावलीच्या वेळी कर्नाटक राज्यशासनाच्या अधीन असलेल्या धर्मादाय विभागाच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांमध्ये गोपूजा करण्यासाठी सरकारने आदेश काढला आहे. यासंदर्भात धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, ‘या सर्व मंदिरांमध्ये ५ नोव्हेंबरला बलीप्रतिपदेच्या दिवशी सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत गोपूजन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बलिप्रतिपदेला होणारे गोपूजन ग्रामीण भागात महत्त्वाचा सण आहे. घरातील सर्व गायी आणि त्यांच्या वासरांना अलंकृत करून त्यांची पूजा करून त्यांना खायला घालण्याची प्रथा अजूनही आचरणात आणली जाते. कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेला श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोपालांचे रक्षण केल्याचे सांगितले जाते. या दिवशी गोवर्धन आणि गोमाता यांची पूजा करण्याची प्रथा आहे.’