शेतकर्यांचा तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना घेराव
दोडामार्ग – तिलारी पाटबंधारे (धरण) विभागाच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही उजव्या कालव्यात पाणी आलेले नाही. त्यामुळे घोटगेवाडी, परमे येथील शेतकर्यांच्या केळीच्या बागा पाण्याच्या अभावी करपून जात आहेत. घोटगे येथील शेतकर्यांनी कनिष्ठ अभियंता यांच्याशी ८ दिवसांपासून दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि कालव्यातील हे भराव काढण्याची विनंतीदेखील केली; मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी शाखा अभियंता साठे यांना २२ ऑक्टोबरला घेराव घातला अन् कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या वेळी कोरे यांनी ‘कालव्यातील भराव काढण्यासाठी व्यवस्था करतो’, असे आश्वासन दिले. (निष्क्रीय प्रशासनाला कार्यरत करण्यासाठी जनतेला आंदोलनांचाच अवलंब करावा लागतो, हे दुर्दैवी ! – संपादक) कालव्यात २ ठिकाणी पडलेला मातीचा भराव न काढल्यास येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, अशी चेतावणीही शेतकर्यांनी दिली.
तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यावर घोडगेवाडी, घोटगे, परमे, कुडासे आदी गावांतील शेतकरी प्रामुख्याने केळीच्या बागायती आणि अन्य पीक घेतात. या बागायतींना ऑक्टोबर मासाच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची अधिक आवश्यकता असते. अन्यथा केळीची झाडे सुकून जातात. ही परिस्थिती या विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना ज्ञात आहे. शिवाय गेल्या २ वर्षांत पाण्यासाठी येथील शेतकर्यांना आंदोलनदेखील करावे लागले होते. तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रतिवर्षी कालव्याचे पाणी बंद होऊन केळीच्या बागायतीची मोठ्या प्रमाणात हानी होते, असा आरोप शेतकर्यांनी केला आहे. (शेतकर्यांनी आंदोलन करूनही, तसेच प्रतिवर्षी उद्भवणारी समस्या ज्ञात असूनही अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे अधिकार्यांच्या समाजाप्रतीच्या जाणिवा बोथट झाल्याचे द्योतक आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का ? – संपादक)
उजव्या कालव्यात २ ठिकाणी मातीचे भराव साचलेले आहेत. हे भराव दूर केले, तर कालव्यातून व्यवस्थितरित्या परमे, कुडासे या गावांपर्यंत पाणी पोचू शकते.