काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपकीर्तीचे षड्यंत्र’ या विषयावर विशेष ऑनलाईन चर्चासत्र !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

श्री. उदय माहुरकर

पुणे – अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे सय्यद अहमद हे वर्ष १८८३ पासून भारताचे विभाजन आणि भारतावर इस्लामची सत्ता स्थापणे यांविषयी सतत वक्तव्ये करत होते. मुस्लिम लीगनेही त्यासाठी देशभरात अधिवेशने घेऊन सिद्धता चालू केली होती. ‘भारताची फाळणी होणार’, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या ७ वर्षे आधीच जाहीररित्या सांगितले; मात्र काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते यांनी ते अमान्य करत त्याकडे दुर्लक्ष केले. मुस्लिम लीगच्या हिंसाचारानंतर काँग्रेसने त्याला विरोध न करता मुसलमानांचे लांगूलचालन चालूच ठेवले. सावरकरांची विचारसरणी ही अखंड हिंदुस्थानची होती. विभाजनाची मुख्य २ कारणे आहेत. एक म्हणजे मुसलमानांचे तुष्टीकरण आणि दुसरे म्हणजे संपूर्ण अहिंसा ! ही दोन्ही सूत्रे एकमेकांमध्ये गुंतल्याने देशाचे विभाजन झाले. सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे, काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष सिद्ध केला असता अन् विरोधाची फळी निर्माण केली असती, तर भारताची फाळणी नक्कीच टाळता आली असती, असे प्रतिपादन ‘वीर सावरकर : द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेन्टेड पार्टिशन’ या पुस्तकाचे लेखक तथा भारताचे माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपकीर्तीचे षड्यंत्र’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ, यू ट्यूब आणि ट्विटर या माध्यमांतून २ सहस्र ४६० जणांनी पाहिला.

श्री. उदय माहुरकर म्हणाले की,

१. ज्या लोकांची विचारसरणी देशाच्या विभाजनावर टिकून आहे, असे डावे आणि काँग्रेसवाले सावरकरांना अपकीर्त करण्याची षड्यंत्रे रचत असतात; कारण सावरकरांचे विचार कृतीत आणले, तर या देशातील हिंदु शक्ती संघटित होईल आणि देशाचे तुकडे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सावरकरांना सतत विरोध केला जातो.

२. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाचे विभाजन होणार असल्याच्या धोक्याची जाणीव करून दिली होती; पण गांधी आणि नेहरू म्हणाले, ‘‘भारताचे विभाजन हे आमच्या मृतदेहांवरून होईल.’’ आज आपण पहातो, तर सावरकर खरे ठरले आणि गांधी-नेहरू चुकीचे ठरले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची लढाई ही कट्टर मुसलमानांच्या विरोधात होती. ती सामान्य मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या विरोधातील नव्हती.

३. वर्ष १९३९ मध्ये लखनऊ येथील शिया मुसलमानांनी एक ठराव संमत केला. ‘गायीची हत्या करणारा मुसलमान हा हिंदु एकतेचा विरोधक आहे. हिंदू मशिदीवरून मिरवणूक काढत असतील, तरी मुसलमान त्यांना विरोध करणार नाहीत’, असे ठरावानुसार गृहीत धरले जाणार होते. सावरकरांनी या प्रस्तावाचे स्वागतच केले. ते म्हणाले, ‘‘आम्हीही आमच्या हिंदु बांधवांना सांगू की, जाणूनबुजून मशिदीवरून मिरवणूक काढू नका.’’ सावरकरांनी इतका विचार केलेला असूनही त्यांना अपकीर्त केले जावे, ही विश्वातील एकमेव घटना असू शकते.

४. ‘वीर सावरकर…’ या पुस्तकातून भारताचे दुसरे विभाजन होऊ नये, तसेच त्याला कसे रोखायचे ?, याविषयी मार्गदर्शन केले आहे. अराष्ट्रीय तत्त्वांशी कसे लढायचे ?, याची दिशा देणारा हा जणू ‘रोड मॅप’च आहे. आपल्या देशाला महान करण्यासाठीची मार्गदर्शक सूत्रे सांगणारे हे पुस्तक आहे.

मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्‍या देशद्रोही काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार देत देशाचे अखंडत्व टिकवण्यासाठी प्रयत्न करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर ! – उदय माहुरकर

तत्कालीन काँग्रेसमधील सुभाषचंद्र बोस, एस्.एम्. जोशी, अच्युतराव पटवर्धन अशा मोठ्या नेत्यांनी सावरकरांना काँग्रेसमध्ये येण्याचा आग्रह केला होता. तेव्हा सावरकर म्हणाले, ‘‘काँग्रेस मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याच्या वाटेवर एवढी पुढे गेली आहे की, तिच्यात पालट होणे अवघड आहे. भारतवर्षात हिंदूंना अल्प लेखून मुसलमानांचे तुष्टीकरण करणे म्हणजे हिंदू आणि देश यांच्या समवेत द्रोह केल्यासारखे आहे. हे मी कदापीही करू शकत नाही.’’ सावरकरांचा हा विचार महाराणा प्रताप यांच्याप्रमाणेच आहे. भारत आणि काँग्रेसी यांना सावरकरांनी प्रत्येक वेळी सांगितले की, मुसलमानांचे तुष्टीकरण म्हणजे देशाच्या अखंडत्वाला धोका आहे. भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल.

पुराव्यांअभावी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गांधी हत्येत गोवून त्यांचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्यात आले ! – रणजीत सावरकर, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष

श्री. रणजित सावरकर

१. काँग्रेसच्या नीतीने नेहमीच सावरकरांना अपकीर्त केले. मोहनदास गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ या दिवशी झाली नसती, तर त्या दिवशी काँग्रेस विसर्जित होणार होती. तसे झाले असते, तर नेहरूंना सत्तेपासून दूर जावे लागले असते आणि ‘हिंदु महासभा’ हा दुसरा मोठा पक्ष म्हणून पुढे आला असता; मात्र पुराव्यांअभावी सावरकरांना गांधी हत्येत गोवून त्यांचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्यात आले. हे पहाता ‘गांधी हत्येचा खरा लाभ कुणाला झाला ?’, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

२. गांधी हत्येच्या आधीचा म्हणजे १२ ते ३० जानेवारी १९४८ हा कालखंड फार महत्त्वाचा होता. १२ जानेवारी या दिवशी भारतीय मंत्रीमंडळाने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा ठराव संमत केला; मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला विरोध केला. ते म्हणाले, ‘‘मी या मंत्रीमंडळात राहू शकत नाही. त्यामुळे मी त्यागपत्र देतो.’’ तेव्हा गांधी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही किंवा नेहरू यांपैकी एक जणच मंत्रीमंडळात रहाल. दुसरा पक्षाचे कार्य करेल. तुम्ही पक्षाचे कार्य करा आणि ३१ जानेवारी या दिवशी त्यागपत्र द्या.’’

३. नेहरूंच्या विश्वासात असणारे जयप्रकाश नारायण, गुरुराज साराभाई आदींनी सरदार पटेल यांच्या विरोधात आंदोलन उभे केले. तेव्हा त्यांनी ‘पटेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत आहेत’, असे जाहीरपणे सांगितले. ‘पटेल यांनी जाणूनबुजून गांधींची सुरक्षा अल्प केली आणि तेच गांधी हत्येला उत्तरदायी आहेत’, असा अपप्रचार चालू केला. त्यामुळे पटेल यांच्यावरील दबाव वाढून त्यांना मंत्रीमंडळातून बाहेर जावे लागले. त्यानंतर नेहरू यांनी सत्तेत वंशपरंपरा प्रस्थापित केली. ती अजूनही चालूच आहे.

४. सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्याचे राजकारण करत आली आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत केवळ देशाप्रती निस्सीम प्रेम आणि मातृप्रेमच आहे.

‘मी ब्रिटीश शासनाशी एकनिष्ठ राहीन’, ही प्रतिज्ञेची अट अमान्य करत ‘बॅरिस्टर’ पदवी नाकारणे यातूनच सावरकरांची देशाप्रतीची निष्ठा दिसते ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्षमा मागितली; म्हणून त्यांची अपकीर्ती करणारे नवशिके डावे लोक इतिहासाचा अभ्यास करत नाहीत. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापन करणारे कॉ. डांगे यांनी कारागृहातून स्वत:ची सुटका व्हावी, म्हणून ब्रिटिशांना लिहिलेल्या दया याचिकेत ते म्हणतात, ‘मी ब्रिटिशांशी द्रोह केलेला नाही आणि भविष्यात कधीही तसे करणार नाही. मी आपला सेवाधारी आहे.’ खरेतर साम्यवाद्यांना याची लाज वाटली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या याचिकेमुळे शेकडो भारतीय राजबंदीवानांची मुक्तता झाली.

२. बॅरिस्टरचे शिक्षण झाल्यावर ती पदवी घेण्यासाठी ‘मी ब्रिटीश शासनाशी एकनिष्ठ राहीन’, ही प्रतिज्ञेची अट अमान्य करत सावरकरांनी बॅरिस्टर पदवी नाकारली होती. यातून त्यांची देशाप्रतीची निष्ठा दिसते; मात्र अनेक काँग्रेसी नेत्यांनी ‘बॅरिस्टर’ची पदवी घेतली. त्यांना काँग्रेसी का खडसावत नाहीत ? क्रांतीकार्य शिकण्यासाठी साम्यवाद्यांचे नेते लेनीन हे ३ दिवस ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आश्रयाला होते. सावरकरांचे देशकार्य पाहिल्यावर मुंबईत साम्यवादी नेत्यांनी त्यांचा मोठा नागरी सत्कार केला होता, हे आजचे डावे विचारवंत का सांगत नाहीत ?

३. तत्कालीन काँग्रेसची विचारधारा अहिंसावादी होती. गांधींनी कधीच जहाल आणि हिंसावादी नेत्यांचे समर्थन केले नाही. वर्ष १९३७ मध्ये सावरकर राजकारणात आले. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्यक्ष झाले. ते म्हणाले, ‘‘हिंदूंनी सैन्यात भरती व्हायला हवे. त्यामुळे भारतीय सैन्यात हिंदूंचे प्रमाण ३५ वरून ६५ टक्के झाले. याच सेनेने वर्ष १९४८ च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत भारताला विजय मिळवून दिला आहे.