राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‘डिसमेंटलिंग कास्टिझम’च्या ऐवजी ‘डिसमेंटलिंग ऑफ हिंदुत्व’ या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असल्याचा चुकीचा उल्लेख !

रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिलेल्या चुकीच्या माहितीविषयी जिल्ह्यात केला जात आहे निषेध !

अशी चूक करणार्‍यांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

रत्नागिरी – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज २५ ऑक्टोबर या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये परिसंवादाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. वास्तविक दोन दिवस असलेला हा परिसंवाद  ‘Dismantling of Casteism. Lessons from Savarkar’s Essentials of Hindutva’ या विषयावर आहे. तेथे राज्यपाल कोश्यारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. असा कार्यक्रम असतांना रत्नागिरीच्या जिल्हा माहिती कार्यालयाकडून मात्र चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘डिसमेंटलिंग कास्टिझम’च्या (dismantling of Casteism) ऐवजी ‘डिसमेंटलिंग ऑफ हिंदुत्व’ (dismantling of Hindutva) अशी बातमी प्रसारमाध्यमांना देण्यात आली. ‘जातीभेदाचे उच्चाटन’ याऐवजी ‘हिंदुत्वाचे उच्चाटन’, अशी बातमी शासकीय पातळीवर देण्यात आली. पतित पावन मंदिर संस्थेच्या वतीने, तसेच रत्नागिरीतील सर्व नागरिकांकडून याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

राजकीय हेतूने जाणीवपूर्वक घडवलेली चूक ! – पतित पावन मंदिर संस्था

‘ही केवळ साधी चूक नसून गैरहेतूने आणि समाजात चुकीचा संदेश जावा, यासाठी राजकीय हेतूने जाणीवपूर्वक घडवलेली आहे’, अशी प्रतिक्रिया पतित पावन मंदिर संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. वास्तविक ‘सावरकरांचे हिंदु धर्मातील जातीभेद निर्मूलन’, असा परिसंवादाचा विषय आहे.