नोंद
शेतकर्यांच्या पिकांची हानी टाळण्यासाठी कुणाकडून कसलेही मानधन न घेता अवघ्या काही मिनिटांत ३ कोटी लोकांपर्यंत शेती आणि हवामान यांचे अनुमान पोचवणारे श्री. पंजाबराव डख हे शेतकर्यांचे हितचिंतक बनले आहेत. श्री. डख हे मूळचे गुगळी धामणगाव (जिल्हा परभणी) येथील असून ते गावातील शाळेत अंशकालीन (आठवड्यातून काही घंटे चाकरी) शिक्षक आहेत. ते स्वत:चा बहुतेक वेळ हा शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घालवतात. श्री. पंजाबराव डख हे मुळात प्रगतशील शेतकरी असून त्यांचे शेती आणि शेतकरी यांवर जीवापाड प्रेम आहे. शेतीसमवेतच त्यांचा हवामानाविषयीचा चांगला अभ्यास आहे. श्री. डख हे वर्ष १९९५ पासून हवामानाच्या अभ्यासावर स्वत:ची निरीक्षणे नोंदवून पावसाचे अचूक अनुमान नोंदवतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या नोंदी स्वत:च्या वहीत लिहून ठेवतात. या नोंदींचा हवामानाविषयी अचूक अनुमान वर्तवतांना त्यांना चांगला लाभ होतो. वर्ष २०१६ पासून ‘अँड्रॉईड’ प्रणालीच्या भ्रमणभाषमधील सामाजिक माध्यमांचा वापर करून श्री. डख यांना शेतकर्यांपर्यंत हवामानाचे अनुमान पोचवणे शक्य झाले. त्यांनी ‘व्हॉट्सॲप’चे ३६० गट बनवले असून ३ मिनिटांत २ लाख ५० सहस्र लोकांपर्यंत आणि पुढे त्याचा प्रसार अवघ्या काही मिनिटांत ३ कोटी लोकांपर्यंत पुढील १५ दिवसांच्या हवामानाचे अनुमान पोचते.
सध्या निसर्ग हा लहरी बनला आहे. या लहरीपणाचा फटका पारंपरिक शेती पद्धतीला बसत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी निसर्गाचा अंदाज घेत शेती केली पाहिजे आणि शेतीतील उत्पन्न वाढवले पाहिजे, ही श्री. डख यांची भूमिका आहे. शेतकर्यांना एका सर्वसामान्य माणसाचा आधार वाटत आहे, तो कोट्यवधी रुपये व्यय करून उभारलेल्या सरकारी हवामान केंद्रांविषयी का वाटत नसावा ? ‘माझ्या शेतकर्यांची हानी होऊ नये’, अशी इच्छाशक्ती सरकारी यंत्रणेत का दिसत नाही ? सरकारच्या अनेक संस्था कार्यरत आहेत. तरी आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात शेतकर्यांच्या बांधावर हवामानाचे अचूक अनुमान पोचवण्यात सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे, असे राज्यातील शेतकर्यांना वाटल्यास चूक ते काय ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे रयतेची काळजी घेतली जात होती, अगदी तीच काळजी आज जर घेतली गेली, तर शेतीसमवेत देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव