मुंबईत ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या कारवाईचे प्रकरण
गोसावी यांच्या अंगरक्षकाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित
मुंबई – अमली पदार्थ विरोधी पथकाने २ ऑक्टोबरच्या रात्री ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर केलेल्या कारवाईत आर्यन खान याच्यासह अन्यांना अटक करण्यात आल्यानंतर मुख्य साक्षीदार असलेले किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गोसावी यांचाच अंगरक्षक प्रभाकर साईल याने हे आरोप केले आहेत. गोसावी यांनी शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यांतील अमली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना ८ कोटी रुपये द्यायचे होते, असे साईल याने म्हटले आहे. याविषयी त्याने स्वत:चा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे.
त्यात प्रभाकर साईल याने सांगितले, ‘‘क्रूझ’वर धाड टाकण्यात आली, त्या दिवशी किरण गोसावी यांनी मला ‘येलो गेट’ येथे बोलावले होते. त्यांनतर माझ्या जिवाला धोका असल्याने मी सोलापूर येथील परिचितांकडे काही दिवस राहिलो.’’
‘क्रूझ’वरील धाडीनंतर ३ आठवड्यांनंतर प्रभाकर साईल याने ही माहिती दिली आहे. त्यामुळे या व्हिडिओविषयी साशंकता व्यक्त केली जात असली, तरी या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढली आहे.
सौजन्य : पोलीसनामा न्यूज
खोटे बोलून समीर वानखेडे यांना आरोपी ठरवण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षेनेते, विधान परिषद
अमली पदार्थ विरोधी पथक आणि समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा निश्चित कार्यक्रम नवाब मलिक अन् संबंधित नेते यांच्याकडून राबवला जात आहे. ओढून ताणून आणि खोटे बोलून अन्वेषण यंत्रणेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे.
प्रभाकर साईल याने त्याचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात मांडावे ! – अमली पदार्थ विरोधी पथक
मुंबई – प्रभाकर साईल हा महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याने केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्याला जे काही सांगायचे आहे, ते त्याने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात मांडावे, अशी भूमिका अमली पदार्थ विरोधी पथकाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे. दुसरीकडे पथकाचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी साईल याने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून ‘आरोपांना योग्य वेळी उत्तर देऊ’, असे म्हटले आहे.