निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १० ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘शिक्षणप्रणाली कशी असावी, हे बुद्धी ठरवू शकते का ?’, याविषयी केलेले विवेचन प्रसिद्ध करण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

(भाग १३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/517955.html
पू. डॉ. शिवकुमार ओझा

५३. आधुनिक शिक्षण आणि अडचणी

५३ अ. आधुनिक शिक्षणाचे दुष्परिणाम आणि मानवी बुद्धीची असमर्थता : ज्याने आधुनिक शिक्षणाचा प्रसार केला आहे, अशा भोगवादी पाश्चात्त्य मनुष्याच्या चिंतनप्रक्रियेवर आधुनिक शिक्षणाचा पाया आधारित आहे. सध्या विश्व आणि भारत येथे हेच शिक्षण सर्वाधिक प्रचलित आहे. आधुनिक शिक्षण मनुष्याचे चारित्र्य निर्माण करू शकत नाही. मानवी प्रवृत्तीच्या विकृतींना रोखू शकत नाही. यामुळे समाजात दैनंदिन निकृष्ट कृती घडत आहेत. त्या वाढतच चालल्या आहेत. या परिणामांमुळे सध्याचे सर्व बुद्धीमान लोक असंतुष्ट, चिंतित आणि अस्वस्थ आहेत. आधुनिक शिक्षणाकडे यावर कोणतेही योग्य उत्तर नाही. निकृष्ट परिणामांना रोखण्यासाठी कोणते परिणामकारक उपाय करावेत, याचेही उत्तर नाही. आतापर्यंत अभ्यासलेल्या बुद्धीच्या मर्यादा पाहून आपण अवश्य म्हणू शकतो की, मानवी व्यावहारिक बुद्धी शिक्षणप्रणालीसंबंधी यथार्थ दृष्टीकोन विकसित करण्यात आणि योग्य उत्तर शोधण्यात असमर्थ आहे.’

५४. शंका उपस्थित झाल्यावर मतमतांतरे, तसेच तर्कवितर्क निर्माण होणे

कोणत्याही विषयासंबंधी शंका उपस्थित झाल्यास मनुष्य तिचे निरसन (समाधान) करून घेण्याचा प्रयत्न करतो; पण अनेकदा मतमतांतरे होतात. एखादी व्यक्ती बुद्धीमत्तेने स्वतःचे विचार मांडते; परंतु दुसरी व्यक्ती त्या विचारांना खोडून काढून तिचा तर्क मांडते; परंतु हा तर्क पहिल्या व्यक्तीला मान्य होत नाही आणि ती व्यक्ती त्याविषयी कारणे देते. अशा प्रकारे तर्क-वितर्क किंवा वादविवाद यांविषयीची प्रक्रिया चालू होते आणि कोणताही निश्चयात्मक निर्णय होऊ शकत नाही.

५५. दूरचित्रवाणीवरील चर्चासत्राच्या कार्यक्रमात निश्चयात्मक निर्णयापर्यंत पोचता न येणे आणि त्याचा शेवट संशयास्पदच रहाणे

सध्या दूरचित्रवाणीवर विभिन्न विषयांवर चर्चा आणि वादविवाद दाखवले जातात. त्यातून समस्येचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा भव्य सभागृहात चर्चा होतात. तेथे या विषयाशी संबंधित आणि शिक्षित लोकांनाच आमंत्रित करण्यात येते. चर्चा अतिशय विद्वत्तापूर्ण होतात; परंतु शेवटी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोणत्याही निश्चयात्मक निर्णयापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे कार्यक्रमाचा शेवट करतांना तो कोणत्याही वक्त्याला दुःख होऊ नये, अशा पद्धतीने बोलतो. चर्चेचा निर्णय शेवटपर्यंत संशयास्पद का रहातो आणि निश्चयात्मक निर्णय का होऊ शकत नाही ? याचा कधी विचार केला आहे का ?

५६. वैज्ञानिक स्तरावरील लिखाणात ‘संभवतः’ किंवा ‘कदाचित्’ या शब्दांचा उल्लेख असणे, ‘श्रीमद्भगवद्गीते’मध्ये विभिन्न गूढ विषयांवर चर्चा केलेली असूनही ‘संभवतः’ किंवा ‘कदाचित्’ या शब्दांचा उल्लेख नसणे आणि हे केवळ निश्चयात्मक बुद्धीमुळे शक्य होणे

आधुनिक युगातील उच्चस्तरीय जगन्मान्य वैज्ञानिक ग्रंथ किंवा संशोधन, तसेच संशोधनविषयक नियतकालिके (Research Journals) पहावीत. त्यात ‘संभवतः’ किंवा ‘कदाचित्’ (Probably or may be) या शब्दांचा वापर केलेला असतो. भारतीय संस्कृतीतील प्राचीन प्रमाणित ग्रंथांमध्ये कुठेही कोणत्याही विषयाच्या चर्चेसंबंधी ‘संभवतः’ किंवा ‘कदाचित्’ शब्दांचा वापर केलेला नाही. प्रत्येक विचार निश्चयात्मक बुद्धीने लिहिला गेला आहे, उदा. ‘श्रीमद्भगवद्गीते’मध्ये विभिन्न गूढ विषयांवर चर्चा करण्यात आल्या आहेत; परंतु कोणत्याही ठिकाणी ‘संभवतः’ किंवा ‘कदाचित्’ हे शब्द वापरले गेलेले नाहीत. असे कशामुळे होऊ शकते ? आपल्याला अशीच निश्चयात्मक बुद्धी शिक्षणप्रणाली निर्धारित करण्यासाठी अपेक्षित आहे; कारण त्या बुद्धीतच मनुष्याला उच्चतर आणि उच्चतम बनवण्याचे सामर्थ्य असते.

५७. कौशल्यपूर्ण आणि निश्चयात्मक बुद्धी असण्यासाठी आवश्यक असणारे घटक आणि त्यांची अपरिहार्यता !

कौशल्यपूर्ण आणि निश्चयात्मक बुद्धीसाठी वासना, स्वार्थ, भय, कुसंस्कार, अहंकार इत्यादींपासून दूर रहायला हवे. चांगले संस्कार, विचार आणि सदाचरण असायला हवे. राग, द्वेष आणि तृष्णा इत्यादींच्या वासना मनुष्याला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत. मनुष्याच्या स्वार्थामध्ये सतत पालट होत असतो. त्यामुळे तो योग्य आणि निश्चयात्मक निर्णय घेण्यास अपयशी ठरतो. मनुष्याला समाज, सरकार आणि परिस्थिती यांचे भय वाटते. त्यामुळे योग्य किंवा निश्चयात्मक निर्णय घेणे शक्य होऊ शकत नाही. मनुष्याच्या चित्तात वर्तमान जीवनाचे आणि पूर्वजन्मीचे कुसंस्कार असतात. जोपर्यंत ते काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत मनुष्याला कुशलतेने आणि निश्चयात्मक निर्णय घेणे शक्य होत नाही. मनुष्याचा अहंकारसुद्धा योग्य आणि निश्चयात्मक निर्णय घेण्यात बाधा आणतो. म्हणून आम्ही पहातो की, व्यावहारिक मनुष्याची बुद्धी विभिन्न दोषांनी ग्रासलेली असते. त्यामुळे योग्य (कौशल्यपूर्ण) आणि निश्चयात्मक निर्णय अशा बुद्धीकडून घेतला जाणे शक्य होत नाही.

५८. ऋषींची बुद्धी तेजस्वी असल्याने त्यांनी मांडलेल्या विचारांच्या आधारावरच आधुनिक शिक्षणातील दोष दूर होणार असणे आणि त्यांचे तेजस्वी विचार हाच भारतीय संस्कृतीचा प्राण असणे

भारतीय ऋषींची बुद्धी शुद्ध, पवित्र, दोषरहित, अधिक चैतन्यमय आणि तेजस्वी होती. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये व्यापक दृष्टीकोन असायचा. तो योग्य आणि निश्चयात्मक बुद्धीमुळेच व्यापक होतो. परंपरागत रूपाने भारतीय विद्वानांना ते विचार आणि उपदेश यांप्रती पुष्कळ आदर अन् श्रद्धा आहे. जेव्हा ऋषींद्वारे मांडलेल्या विचारांचा आधार असेल, तेव्हाच आधुनिक शिक्षणातील दोष दूर केले जाऊ शकतील. हा आधारच भारतीय संस्कृतीचा प्राण आहे.’

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)