बांगलादेशच्या उच्चायुक्तांकडे व्यक्त केला निषेध !
अत्याचार रोखण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी ! – आमदार मंगलप्रभात लोढा, भाजप
या धर्मांधतेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेशच्या विरोधात ठोस भूमिका घेण्याची मागणी भाजपने वरिष्ठांकडे करावी !
मुंबई – बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर धर्मांधांकडून होत असलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ २० ऑक्टोबर या दिवशी भाजपकडून कफ परेड मैदानावर हातात फलक धरून आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या शिष्टमंडळाने बांगलादेशच्या उच्चायुक्तांची भेट घेऊन हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध नोंदवला.
या आंदोलनात महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज, भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी ‘या आक्रमणाविषयी बांगलादेश सरकारने ठोस भूमिका घ्यावी’, अशी मागणी केली.
या वेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘बांगलादेशमध्ये आक्रमकांनी दुर्गा पूजा मंडळावर आक्रमण करत देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. यामुळे हिंदु समाज अतिशय दुःखी झाला आहे. याला कारण स्थानिक आतंकवादी संघटना आहे. त्यांच्या चिथावणीखोर अफवांमुळे हिंदूंवर आक्रमणे होत आहेत.’’
भारतातील संत बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे अत्याचार सहन करणार नाहीत ! – महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज
भारताचे बांगलादेशसमवेत चांगले संबंध आहेत; परंतु हिंदूंचा अशा प्रकारे छळ करणे, हे बांगलादेशसमवेत असलेले संबंध कायमचे संपवण्यासारखे आहे. भारतातील संत हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाहीत.