भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना १० टक्के रक्कम परत करण्यास प्रारंभ

पतसंस्थेच्या ठेवीदारांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग – अवसायनात (बुडित) गेलेल्या ‘भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गारगोटी, कोल्हापूर’ या पतसंस्थेने आपल्या ठेवीदारांच्या एकूण मुद्दलाच्या १० टक्के रकमेची परतफेड करण्यास प्रारंभ केला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत या ठेवी देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या ठेवींची परतफेड झालेली नाही, त्यांनी तात्काळ यासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या अधीक्षक श्रीमती यु.यु. यादव यांनी केले आहे.

‘भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था कर्जाची थकबाकी वाढल्याने वर्ष २००७ मध्ये अवसायनात गेली. त्यामुळे संस्थेचे विविध ठेवीदार, ठेवीदार संघटना आणि कर्जदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका प्रविष्ट केल्या होत्या. यावरील सुनावणीच्या वेळी कर्ज वसुलीची कारवाई ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्याचप्रमाणे या पतसंस्थेच्या अध्यक्षांनी ठेवीदारांच्या एकूण मुद्दलाच्या १० टक्के रक्कम ३० नोव्हेंबरपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपरोक्त पतसंस्थेच्या सर्व ठेवीदारांनी त्यांची रक्कम मिळण्यासाठी पतसंस्थेकडे विहित मुदतीत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.