अमरावती येथे शेतकर्‍यांना साहाय्य देण्याच्या सूत्रावरून आमदार रवि राणा यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ !

पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवि राणा यांच्यात खडाजंगी !

राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची अतोनात हानी झालेली असतांना त्यांना साहाय्य करून आधार देणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी हे लक्षात घेऊन वाद न घालता सामंजस्याने प्रश्न सोडवावेत, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.

यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यामुळे लगेच रवी राणा हे सभागृह सोडून बाहेर पडले

अमरावती – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १८ ऑक्टोबर या दिवशी आमदार रवि राणा यांनी शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी साहाय्य देण्याच्या सूत्रावरून गोंधळ घातला. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली. बैठकीपूर्वी आमदार राणा यांनी स्वतःच्या ‘युवा स्वाभिमान संघटने’च्या कार्यकर्त्यांना समवेत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन भवनासमोर खराब झालेले सोयाबीन जाळून टाकत शेतमाल फेकला. त्यानंतर राणा जिल्हा नियोजन बैठकीत आले.

बैठकीत आमदार राणा यांनी ‘जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी हेक्टरी ३० सहस्र रुपये हानीभरपाई द्यावी. तसा ठराव संमत करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवावा’, अशी आग्रही मागणी केली. यावरून पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

रवि राणा यांची आक्रमकता पहाता पालकमंत्री ठाकूर यांनी ‘पोलीस आयुक्तांना बोलवावे’, असा आदेश दिला; मात्र आमदार राणा हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ‘राणा हे केवळ नौटंकी करत आहेत. मेळघाटातील आदिवासींची भूमी त्यांनी हडप केली आहे’, असा आरोप ठाकूर यांनी केला. त्यानंतर राणा लगेच सभागृह सोडून बाहेर पडले.