संजीवनी साखर कारखान्याच्या प्रश्नावरून आमदार सुदिन ढवळीकर आणि प्रसाद गावकर यांचे विधानसभेत ठिय्या आंदोलन

गोवा विधानसभा

पणजी, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – संजीवनी साखर कारखान्यासंबंधी गेल्या ३ अधिवेशनांमध्ये करण्यात आलेली लक्षवेधी सूचना ही आजच्या अंतिम अधिवेशनातही स्वीकारण्यात आली नाही. याविषयी शासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत जेवणाच्या सुटीत सभागृहात ठिय्या मांडला. या वेळी सांगेचे आमदार श्री. प्रसाद गावकर यांनीही आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांना पाठिंबा दिला.

विधानसभेच्या कामकाजाच्या वेळी प्रारंभी आमदार

श्री. सुदिन ढवळीकर यांनी संजीवनी साखर कारखान्याविषयीची लक्षवेधी सूचना का घेण्यात आली नाही ? याविषयी स्पष्टीकरण मागितले. प्रश्नोतर तास संपल्यानंतर शून्य प्रहराच्या वेळी त्यांनी हाच प्रश्न सभापती राजेश पाटणेकर यांना केला आणि त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. सभापती राजेश पाटणेकर उत्तरादाखल म्हणाले, ‘‘हे अधिवेशन अवघ्या २ दिवसांचे असल्यामुळे सर्व लक्षवेधी सूचना घेणे शक्य नाही. यावर आमदार श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या दोन लक्षवेधी सूचना तुम्ही स्वीकारल्या; परंतु माझी सूचना सलग तिसर्‍या अधिवेशनात मांडूनही स्वीकारली का जात नाही ?’’

सभापतींनी जेवणाच्या सुटीसाठी कामकाज अडीच वाजेपर्यंत स्थगित ठेवले; परंतु आमदार श्री. सुदिन ढवळीकर हे जेवणाला न जाता सभागृहातच बसून राहिले. ‘जोपर्यंत मला स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत सभागृहातून बाहेर जाणार नाही’, असे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी निक्षून सांगितले. सांगेचे आमदार श्री. प्रसाद गावकर हेही त्यांच्यासमवेत बसले. दोघेही आमदार जेवायला जात नाहीत, हे पाहून सभापती राजेश पाटणेकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुन्हा सभागृहात आले अन् त्यांनी ‘जेवणाच्या सुटीनंतर तुमची लक्षवेधी सूचना विचारात घेऊ’, असे आश्वासन दिले. यानंतर आमदार

श्री. सुदिन ढवळीकर आणि आमदार श्री. प्रसाद गावकर जेवणासाठी सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर दुपारी सभागृहाचे कामकाज पुन्हा चालू झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘संजीवनी साखर कारखाना बंद करणार नाही’, असे उत्तर सभागृहाला दिले.