इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाची कहाणी असते ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

श्री. बाबासाहेब पुरंदरे

पुणे – इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाची कहाणी असते. इतिहास अभ्यासल्यामुळे काय चूक आणि काय बरोबर हे समजते. त्यामुळे चुकाही अचूकपणे समजून घेतल्या पाहिजेत आणि संशोधन करून इतिहासाची मांडणी केली पाहिजे, अशी अपेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या वतीने विजयादशमीच्या मुहुर्तावर मंडळाच्या वि.का. राजवाडे सभागृहाचा नूतनीकरण प्रकल्प आणि दुर्मिळ मोडी कागदपत्रांचे ‘डिजिटायझेशन’ करणारा प्रकल्प यांचा प्रारंभ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाला. मंडळाच्या वतीने ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन मेहेंदळे यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेबर पुरंदरे यांना ‘शतायुषी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शिवशाहीर पुरंदरे पुढे म्हणाले की, पैसा आणि कार्यकर्ते अल्प असतांनाही मंडळाने भरीव कार्य केले आहे. मंडळाला अनेक व्रतस्थ मंडळी लाभली. त्यांच्याकडूनच इतिहास संशोधन किती अवघड असते ? याची कल्पना आली. ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे कार्यालय युवा अभ्यासक, कार्यकर्ते, कागदपत्रे आणि वस्तू यांनी बहरावे अन् इतिहास संशोधन क्षेत्रात त्यागी व्यक्ती निर्माण व्हाव्यात.