अहं अल्प असल्याने कर्तेपणा देवाकडे देऊन स्वतः नामानिराळे रहाणारे सनातनचे संत पू. (कै.) विनय भावे !

मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५.६.२०२१ या दिवशी देहत्याग केला. लांजा, रत्नागिरी येथील सौ. शालन शेट्ये यांना पू. भावेकाकांमधील गुणांचे घडलेले दर्शन प्रस्तुत लेखातून त्यांनी शब्दबद्ध केले आहे.

पू. वैद्य विनय भावे

१. देवाकडे कर्तेपणा देऊन स्वतः नामानिराळे रहाणे

अ. एकदा पू. भावेकाका आमच्या घरी आले होते. तेव्हा माझ्या उजव्या हाताचा अंगठा पुष्कळ दुखत होता. त्या वेळी पू. काकांना बिंदूदाबन (‘रिफ्लेक्सॉलॉजी’) करायचे होते. बिंदूदाबन हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी करायचे असते. त्यामुळे माझ्या मनात ‘मी पू. काकांना बिंदूदाबन कसे करणार ?’, असा विचार आला. पू. काकांना काहीही न सांगता मी नेहमीप्रमाणे उपचारांना आरंभ केला. आश्चर्य म्हणजे २ मिनिटांतच माझ्या उजव्या हाताचा अंगठा दुखायचा पूर्णपणे थांबला. हे मी पू. काकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘संतांच्या माध्यमातून ईश्वरच कार्य करत असतो.’’

आ. कोरोना विषाणूमुळे पीडित असलेल्या अनेकांना पू. काकांनी त्यांच्याकडील गोळ्या देऊन बरे केले, तरीही ते कधी स्वतःकडे कर्तेपणा घेत नसत. ते म्हणत, ‘‘मी केवळ औषधे देतो. यश देणे देवाच्या हातात असते.’’

२. प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केल्याचे पू. काकांना सूक्ष्मातून समजणे

एकदा पू. काका घरी आले होते. तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या टाचेला जखम पाहून मी मनातून प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांना प्रार्थना केली, ‘प.पू. बाबा, पू. काकांना या जखमेमुळे पुष्कळ वेदना होत असतील. तुम्ही त्यांची जखम लवकर बरी करा.’ काही दिवसांनी पू. काका आमच्या घरी परत आल्यावर जखम पुष्कळ बरी झालेली होती. तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘तू बाबांना प्रार्थना केल्यामुळे जखम बरी झाली.’’

सौ. शालन शेट्ये

३. अहं अल्प असणे

त्यानंतर माझ्या यजमानांनी पू. काकांना पायाच्या जखमेवर लावण्यासाठी एक मलम आणून दिले आणि मी पू. काकांच्या पायाला लावून दिले. ते काकांना प्रतिदिन लावण्यासही सांगितले. त्याप्रमाणे ते मलम प्रतिदिन लावत असत. ते एवढे उच्च पातळीचे संत आणि अनुभवी वैद्य असूनही त्यांना कुणीही काही सांगितले, तरी ते सहजतेने स्वीकारत असत.

४. प्रत्येक कृती भावपूर्ण करणे

पू. भावेकाका प्रतिदिन श्रीकृष्णाला मोठी तुळशीची माळ वहात आणि फुलांची सजावट करून पूजा करत असत. पू. काकांनी केलेल्या भावपूर्ण पूजेमुळे त्यांच्या घरी असलेल्या श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र यांमध्ये पालट झाले.

५. पू. काकांच्या साधनेचे चैतन्य त्यांच्या मुखमंडलावर जाणवणे

पू. काकांच्या मुखमंडलावरील तेज समाजातील लोकांनाही जाणवत असे. ‘एवढे वय असूनही त्यांच्या तोंडवळ्यावर एकही सुरकुती नाही आणि मुखमंडल इतके तेजस्वी कसे ?’, असा प्रश्न लोकांना पडत असे.

६. पू. भावेकाकांनी बनवलेल्या तेलाविषयी आलेल्या अनुभूती

अ. एक दिवस सोनालीच्या (माझ्या मुलीच्या) केसांना लावण्यासाठी पू. काका स्वतः बनवलेले तेल घेऊन आले. त्या तेलाचा प्रयोग आधी पू. काकांनी स्वतःवर केला होता. त्यामुळे त्यांचे ५० टक्के केस काळे झाले होते. ते तेल त्यांनी सोनालीला लावायला सांगून ‘तेल लावल्यावर काय वाटले ?’, हे सांगायला सांगितले.

त्या रात्री आम्ही तिघांनीही (मी, यजमान आणि सोनाली) डोक्याला ते तेल लावले. सोनालीला तेल लावताच क्षणी पुष्कळ वेळ शंखनाद ऐकू येऊन आनंदाची अनुभूती आली. मला आणि माझ्या यजमानांना स्थिर आणि शांत वाटून चांगली झोप लागली. पू. काकांना हे सर्व सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘भाव तसा देव.’’ ते तेल लावण्यात सातत्य ठेवल्यावर लहान वयात पिकू लागलेले सोनालीचे बरेचसे केस काळे होऊ लागले आहेत.

आ. पू. काकांनी एक वेदनाशामक तेल बनवले आहे. एका महिलेची शरिराची उजवी बाजू पूर्णपणे दुखत होती. अनेक उपाय करूनही काही उपयोग होत नव्हता. तिने पू. काकांना हे सांगितल्यावर त्यांनी तिला ते तेल दिले. २ दिवसांतच तिच्या वेदना थांबल्या. याचे तिला आश्चर्य वाटले. हे तिने पू. काकांना भ्रमणभाष करून सांगितल्याचे त्यांनी मला सांगितले.

‘पू. भावेकाकांचे सर्व सद्गुण आमच्यामध्ये येऊन आमच्या जन्माचे सार्थक होऊ दे’, अशी गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना !’

– सौ. शालन जयेश शेट्ये, लांजा, जिल्हा रत्नागिरी. (१६.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक