चीनच्या सैन्याच्या सीमाभागांतील हालचाली वाढल्या, तरी चीनला प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज ! – भारतीय सैन्य

चीन सर्व सिद्धता करून भारतावर आक्रमण करायची वाट पहाण्याऐवजी भारताने स्वतः आक्रमण करून त्याला योग्य धडा शिकवला पाहिजे ! भारताने आता बचावात्मक रहाण्याची गांधीगिरी सोडली पाहिजे ! – संपादक

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे

नवी देहली – सीमाभागात चीनच्या सैन्याने गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. सैन्याच्या विविध तुकड्यांचा एकत्रित सराव देखील सीमाभागात वाढला आहे. त्यामुळे चीनकडून पुन्हा एकदा आगळीक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताकडूनही आवश्यक ती सर्व सिद्धता करण्यात आली आहे, असे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.

लेफ्टनंट जनरल पांडे पुढे म्हणाले की, चीन सीमाभागात सैन्य आणि वायू दल यांच्या संयुक्त तुकड्यांचा सराव करत आहे. या वर्षी त्यामध्ये विशेष वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बर्‍याच कालावधीपासून ते या प्रकारचा सराव करत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून चिंता वाढली आहे; पण भारतीय सैन्याच्या ‘इस्टर्न कमांड’ने स्वतःची पूर्ण सिद्धता केली असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज आहे. आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गस्त वाढवली आहे. चीनने आगळीक केलीच, तर प्रत्येक ‘सेक्टर’मध्ये चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडे पुरेसे सैन्यबळ उपलब्ध आहे. गस्तीसाठी ‘ड्रोन्स’चाही वापर करण्यात येत असून अत्याधुनिक रडार यंत्रणा, संपर्क यंत्रणा हेही आपल्याकडे उपलब्ध आहे.