संभाजीनगर येथे वेतनवाढीचे आमीष दाखवत व्यवस्थापकाने ८० सहस्र रुपये घेऊन फसवणूक केल्याने तरुणाची आत्महत्या !

स्वत:वर झालेल्या अन्यायामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी धर्माचरण आणि साधना केल्यास मनोबल वाढून संघर्ष करण्याची क्षमता निर्माण होते, हे लक्षात घ्यावे. – संपादक 

संभाजीनगर – येथील ‘बजाज ऑटो’अंतर्गत ‘नील ऑटो प्रा.लि.’ या आस्थापनातील व्यवस्थापक मनोज पवार यांनी वेतनवाढीसह बढतीचे आमीष दाखवून याच आस्थापनातील कामगार शिवनाथ कोलते यांच्याकडून ८० सहस्र रुपये घेतले होते; मात्र पवार यांनी त्याप्रमाणे केले नाही. यामुळे शिवनाथ यांनी आर्थिक विवंचनेतून १६ ऑक्टोबर या दिवशी विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.

मनोज पवार यांना दिलेल्या पैशांचे व्याज वाढत असतांना देणेदारांचा तगादा चालू होता. या नैराश्यातून शिवनाथ यांनी सामाजिक माध्यमावर ‘पोस्ट’ प्रसारीत करत आत्महत्या केली. ‘माझ्या आत्महत्येस व्यवस्थापक मनोज पवार हे पूर्णपणे कारणीभूत आहेत. ते मला गेल्या २ वर्षांपासून वेतनवाढ आणि बढती करण्याचे आश्वासन देत होते’, असे शिवनाथ यांनी संदेशात म्हटले आहे. या घटनेनंतर आस्थापनातील कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त केला, तसेच ‘मनोज पवार यांच्यावर अटकेची कारवाई त्वरित करा आणि नंतरच मृतदेह कह्यात द्या’, या मागणीसाठी फुलंब्री येथे संभाजीनगर-जळगाव मार्गावर काही वेळ कर्मचार्‍यांनी रस्ता अडवला. पोलिसांनी मनोज पवार यांना कह्यात घेण्यासाठी पथक रवाना केले आहे.