‘गोमेकॉ’तील ऑक्सिजनची समस्या हाताळण्यास शासन अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे ! – विरोधी पक्ष

डावीकडून दिगंबर कामत आणि डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी ‘गोमेकॉ’त ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याचा आणि यास ‘गोमेकॉ’चे गैरव्यवस्थापन उत्तरदायी असल्याचे शासननियुक्त समितीने अहवालात म्हटले आहे. राज्य सरकार आपत्कालीन स्थितीत ऑक्सिजनची समस्या हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची मागणी केली आहे. विधानसभेच्या अधिवेशन काळात सभापतींच्या आसनासमोर येऊन ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आदी विरोधी पक्षांनी ही मागणी केली.

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १० ते १४ मे २०२१ या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोनाबाधित रुग्ण दगावले. ११ मे या दिवशी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ‘गोवा खंडपिठाने ऑक्सिजनच्या कमतरतेचे अन्वेषण करावे’, अशी मागणी केली. शासननियुक्त तीन सदस्यीय समितीने ‘गोमेकॉ’त ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याचे अहवालात नमूद केल्याने शासन लोकांच्या आरोग्याविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट होते. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे.’’ विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, ‘‘समितीच्या अहवालानंतर शासन जनतेप्रती असंवेदनशील असल्याचे उघड झाले आहे.’’ ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याचे दायित्व शासनाने घ्यावे.’’