तिलारी धरणाच्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण नसतांना पोटकालव्यांची कामे करण्यास विलवडे, रोणापाल आणि निगुडे येथील शेतकर्‍यांचा विरोध

२२ वर्षांनंतरही तिलारी धरणाच्या मुख्य कालव्यातून गावांपर्यंत पाणी पोचले नसल्याचा आरोप

शेतीप्रधान भारतात शेतकर्‍यांना २२ वर्षे कालव्याच्या प्रतीक्षेत रहावे लागणे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

तिलारी धरण

सावंतवाडी – तालुक्यातील विलवडे, रोणापाल, निगुडे आदी गावांत २२ वर्षांनंतरही तिलारी धरणाचे पाणी कालव्याद्वारे पोचलेले नसतांना येथे पोटकालव्यांचे काम कसे चालू करता ? अगोदर मुख्य कालव्याचे काम पूर्ण करा. तोपर्यंत पोटकालव्यांचे काम चालू करू नये. मुख्य कालव्याचे काम कधीपर्यंत पूर्ण करणार त्यांची अंतिम दिनांक सांगा. प्रत्येक वेळी दिनांक पुढे ढकलून शेतकर्‍यांची फसवणूक करू नका अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी विलवडे, रोणापाल, निगुडे शेतकर्‍यांनी तिलारी धरण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना दिली.

रोणापालचे सरपंच सुरेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑक्टोबरला विलवडे, रोणापाल आणि निगुडे या गावांतील ग्रामस्थांनी कोरे यांची भेट घेतली. २२ वर्षांपूर्वी कवडीमोलाने भूमी देऊनही अद्याप शेतकर्‍यांना पाणी मिळालेले नाही. येणारा प्रत्येक अधिकारी आश्वासन देऊन शेतकर्‍यांची फसवणूक करत आहे. कालव्यातून पाणी सोडलेले नसतांना कालवे फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. पोटकालव्यांसाठी शेतात चर खोदून ठेवल्याने शेती, बागायती यांमध्ये कसे जायचे ? असा प्रश्न निर्माण होत आहे, असे गावडे यांनी कोरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

या वेळी कोरे यांनी ‘संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ. शेतकर्‍यांना त्रास होईल, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही’, असे आश्वासन दिले.

तिलारी धरणाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी केला जाणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च जातो कुठे ?

तिलारी धरणाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. २२ वर्षांनंतरही तिलारी धरणाच्या कालव्यातून तालुक्यातील विलवडे, रोणापाल, निगुडे आदी गावांत अद्यापपर्यंत पाणीच पोचलेले नाही. असे असतांना ‘कालव्याचे आयुष्य संपले आहे’, असे अधिकारी कसे म्हणू शकतात. इतके दिवस कालव्याच्या दुरुस्तीसाठी जो कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला, तो निधी गेला कुठे ? असा प्रश्न सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती कृष्णा सावंत यांनी केला आहे.

तिलारी धरणाच्या कालव्याचा काही भाग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या अनुषंगाने २ दिवसांपूर्वी ‘तिलारी धरणाच्या कालव्यांचे आयुष्य संपत आले आहे’, असे एका अधिकार्‍याचे वक्तव्य प्रसिद्धी माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. याचा संदर्भ देत सावंत बोलत होते.