स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांची आज (१९ ऑक्टोबर) दिनांकानुसार जयंती आहे. अखिल स्वाध्याय परिवार हा दिवस ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली. त्यानिमित्त पूजनीय दादाजींच्या कार्याचा श्री. अनिल साखरे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा येथे देत आहोत.
स्वातंत्र्योत्तर काळातील धर्म, संस्कृती, अध्यात्मातील महत्त्वपूर्ण आणि बहुधा सर्वांत अभिनव समाजसुधारक म्हणून पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांचे नाव घ्यावे लागेल. स्वाध्याय परिवाराचे ते संस्थापक होते. महाराष्ट्रात प्रारंभ झालेली स्वाध्याय परिवाराची ही चळवळ नंतर जगभरात विस्तारली. दादाजींच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाची नोंद घेत भारत सरकारकडून त्यांना पद्मविभूषण, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मॅगेसेसे’ पुरस्कार, तसेच ‘टेम्पलटन’ पुरस्कार (धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार) प्रदान करण्यात आला. भगवद्गीतेच्या सिद्धांताच्या अधिष्ठानावर ‘भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे’ या तत्त्वानुसार सामाजिक उन्नती घडवून आणणारा विराट प्रयत्न म्हणून स्वाध्याय परिवाराची नोंद आधुनिक भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाईल !
वडिलांनी स्थापन केलेल्या पाठशाळेच्या व्यासपिठावरून स्वाध्याय परिवाराची स्थापना
पूजनीय दादाजींचे पिताश्री पूज्य वैजनाथशास्त्री आठवले यांनी वर्ष १९२६ मध्ये ‘धार्मिक ग्रंथांचा अभ्यास व्हावा’ या उद्देशाने (माधवबाग, मुंबई) येथे श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा स्थापन केली होती. २२ व्या वर्षी ऐन तारुण्यात या शाळेचे दायित्व पूजनीय दादाजींवर आले. गीता पाठशाळा आणि प्रतिभासंपन्न पूजनीय दादाजी हे एकमेकांना पूरक ठरले. पूजनीय पूजनीय दादाजींनी अनेक कठीण आणि संघर्षमय परिस्थितीमधून वाट काढत या पाठशाळेचे कार्य चालू ठेवले. पुढे मुंबईमध्ये आल्यावर त्यांनी सर्व प्रकारच्या तत्त्वज्ञानांचा सखोल अभ्यास केला. पुढे करावयाच्या क्रांतीकारी कार्यासाठी गीता पाठशाळेने पूजनीय दादाजींना मार्ग उपलब्ध करून दिला आणि पूजनीय दादाजींनी गीता पाठशाळा आणि येथील ऋषिपरंपरेशी नाते सांगणार्या व्यासपिठाला जगन्मान्यता मिळवून दिली. पाठशाळेचे हे स्थान दादाजींचा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे स्थान बनले. पाठशाळेच्या याच व्यासपिठावरून पूजनीय दादाजींनी क्रांतीकारी अशा ‘स्वाध्याय मंत्रा’चा उद्घोष केला (म्हणजे स्वाध्याय परिवाराची स्थापना केली.) आणि पुढे तो विश्वभर घुमला !
जपान येथील जागतिक धर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
वर्ष १९५४ मध्ये दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेसाठी पूजनीय दादाजींना भारताचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्या परिषदेमध्ये शेवटचे तीन दिवस परिषदेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते.
विदेशात कार्य करण्यासाठी लाखो ‘डॉलर’चे मानधन नाकारून भारतात तत्त्वज्ञान विद्यापिठाची स्थापना
भगवद्गीतेवरील दादाजींचे क्रांतीकारी विचार आणि स्वतःला संस्कृतीच्या कार्यात जोडून घेण्याची अभिलाशा हे पाहून नोबेल पारितोषिक विजेते तत्त्वचिंतक डॉक्टर क्रॉम्प्टन यांनी पूजनीय दादाजींना अमेरिकेत जाऊन कार्य करण्यासाठी लाखो ‘डॉलर’चे (अमेरिकेचे चलन) मानधन, तसेच अन्य सुखसोयी यांचे प्रलोभन त्यांच्यासमोर ठेवले; पण पूजनीय दादाजींनी विनम्रपणे त्याला नकार दिला. पूजनीय दादाजींनी वर्ष १९५६ मध्ये ठाणे येथे गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणार्या तत्त्वज्ञान विद्यापिठाची स्थापना केली. स्वाध्यायच्या कार्यामुळे व्यक्तीमध्ये आणि समाजामध्ये होत असलेले पुष्कळ मोठे परिवर्तन पाहून आचार्य विनोबा भावे पूजनीय दादाजींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते.
पूजनीय दादाजींनी चालू केलेले अभिनव उपक्रम !
अ. भक्तीफेरी : याचे फलस्वरूप म्हणजे समाजामध्ये ईश्वरनिष्ठा, अनुशासन अध्ययनशीलता, ऐक्यभाव येऊन उच्च-नीचता, सुशिक्षित-अशिक्षित, स्पृश्य-अस्पृश्य या भावना नष्ट होऊ लागल्या.
आ. वृक्षमंदिर : ‘वृक्षांतही भगवद्तत्व आहे’, हा दृष्टीकोन ठेवून त्याचे पूजन करण्याचा हा उपक्रम पर्यावरणरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो.
इ. चर्चमध्ये नारायणोपनिषदाचा पाठ : स्वाध्याय परिवारातील लोक ख्रिस्ताच्या जन्मदिनी आणि गुडफ्रायडे या दिवशी चर्चमध्ये जाऊन ‘नारायणोपनिषदा’चे पारायण करतात. तर मुसलमानबहुल देशामध्ये प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनी रक्तदान करण्याचा उपक्रम राबवला जातो. पुढे होणार्या मोठ्या क्रांतिकारक पालटाचा हा आरंभ असेल.
हिंदु धर्मातील विविध समाजघटकांना आपल्या संस्कृतीशी जोडण्याचे काम त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून केले. पूजनीय दादाजींचे क्रांतीकारी प्रयोग आणि उपक्रम यांमुळे व्यक्ती अन् समाज यांमध्ये पुष्कळ मोठा पालट झाला आहे.
विविध उपक्रमांच्या माध्यातून मिळणार्या धनाचा विनियोग !
स्वाध्याय परिवाराकडून मत्स्यगंधा, लोकनाथ अमृतालयम्, योगेश्वर कृषी, हिरा मंदिर, श्री दर्शन यांसारखे विविध उपक्रम राबवले जातात. त्यांतून लाखो रुपयांची ‘अपौरुषेय लक्ष्मी’ (धन) गोळा होते. आजूबाजूच्या गावांमध्ये कोणी अन्न, औषध किंवा शिक्षण यांपासून वंचित राहू नये यासाठी, तसेच कुणाला उपजीविकेसाठी काही अडचण असेल, तर याचा विनियोग करतात. (जागतिक अर्थतज्ञांना ‘आहे’ आणि ‘नाही’ (‘हॅव’ ॲण्ड ‘हॅव नॉट’) ‘यांमधील दरी कशी अल्प करायची ?’, हा प्रश्न भेडसावत असतो. त्यासाठी हे मार्गदर्शक तत्त्व म्हणून उपयोगी पडेल. देणार्यांचा अहंगंड आणि घेणार्यांचा न्यूनगंड काढून वित्त वितरणाचे अनोखे प्रयोग पूजनीय दादाजींनी केले.
वेगवेगळ्या समाजघटकांना संघटित केले जात आहे !
मागील काही वर्षांपासून भारतभर संस्कृतीपासून दूर गेलेल्या वेगवेगळ्या समाजघटकांना पूजनीय दादांजीनी दिलेली त्रिकाल संध्या आणि भक्तीफेरी यांच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना स्वाध्याय परिवारात सहभागी करण्यात येत आहे. त्यामधून त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ मोठे परिवर्तन घडत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
स्वाध्याय परिवार आज आदरणीय जयश्री तळवलकर यांच्या (पूजनीय दादाजी यांच्या कन्या, म्हणजेच दीदी यांच्या) मार्गदर्शनाखाली पूजनीय दादाजींनी घालून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत आहे. आणि दादांना अपेक्षित अशा पंचरंगी क्रांतीच्या जवळ जाण्याचे कार्य आदरणीय दीदींच्या कुशल नेतृत्वाखाली चालू आहे. एवढ्या मोठ्या परिवारावर मायेची पखरण करून त्याला कार्यप्रवृत्त करण्याचे मोठे अवघड काम आदरणीय दीदी करत आहेत. स्वाध्याय परिवार आदरणीय दीदींच्या रूपामध्ये पूजनीय दादांजीच्या दैवी गुणसंपन्न प्रतिभेचे दर्शन घडवतो. पूजनीय दादांच्या जन्मशताब्दीची सांगता करण्यासाठी सध्याच्या कोरोना काळामुळे सार्वजनिक कार्यक्रम शक्य नाहीत; पण विश्वभर पसरलेला स्वाध्याय परिवार त्यांच्या घरातून योगेश्वर कृष्ण आणि पूजनीय दादाजी यांचे पूजन करून अभिवादन करील आणि पुन्हा अधिक जोमाने स्वतःला स्वाध्याय कार्यासाठी कटीबद्ध होईल !
घेतली मी शपथ दादा । कार्य तुमचे मम करी ।।
द्या मला आशिष आता । झेप हो गरूडापरी ।।
ऐक्य, शांती, प्रीती स्थापित । मानवाच्या मंदिरी ।।
विश्व स्वाध्याय बनावे । हीच आशा अंतरी ।।
जय योगेश्वर ।
श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, तरखड, वसई, जिल्हा पालघर.