वेंगुर्ले – तालुक्यातील कालवी बंदर येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील साखरीनाटे येथील नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने पकडले होते. या प्रकरणी येथील तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी संबंधितांना ५ सहस्र रुपये दंड, ३ मासांसाठी नौकेची अनुमती रहित करणे आणि नौकेवरील मासे पकडण्याची जाळी कह्यात घेण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाला दिले आहेत.
वेंगुर्ले मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने गस्तीनौकेद्वारे येथील समुद्रात गस्त घालत असतांना १२ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ वाजता कालवी बंदरापासून ९.५ सागरी मैलांवर मासेमारी करत असलेली नौका आढळली. या नौकेची तपासणी केली असता साखरीनाटे येथील अल्तियाज बोरकर यांच्या मालकीची नौका असल्याचे स्पष्ट झाले. १२ खलाशांची क्षमता असतांना नौकेत ३२ खलाशी होते, तसेच नौकेमध्ये अवैधरित्या ठेवलेली पर्ससीन जाळी आढळली होती. कारवाईनंतर नौका मालवण बंदरात आणून नंतर कारवाईचा प्रस्ताव वेंगुर्ला तहसीलदारांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी उपरोक्त कारवाई केली.