फोंडा आणि आगोंद येथील खुनांतील संशयित २४ घंट्यांत पोलिसांच्या कह्यात

गोव्यात २ दिवसांत ४ व्यक्तींचा खून

पणजी, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यात २ दिवसांत ४ व्यक्तींचा खून झाल्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. हणजुणे येथे १५ ऑक्टोबर या दिवशी पार्किंग कंत्राटदार सागर नाईक याचा कर्नाटकातील टोळीतील ५ जणांनी मारहाण करून खून करणे, १६ ऑक्टोबर या दिवशी सुपर मार्केट, फोंडा येथे कामत रेसिडेन्सीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेमध्ये दोघा बहिणींची धारदार शस्त्रांनी झालेली निर्घृण हत्या आणि वैवाहिक वादातून बंदुकीची गोळी झाडून आगोंद येथे पत्नीचा पतीने केलेला खून, अशा घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे गोव्यात खळबळ माजली आहे.

फोंडा येथील दुहेरी खून प्रकरणाची घटना घडल्यानंतर २४ घंट्यांच्या आत संशयिताला कह्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. जीवन कामत आणि मंगला कामत या सख्ख्या बहिणींचा खून केल्याच्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी सुर्ल, डिचोली येथील संशयित महादेव घाडी (वय ३४ वर्षे) याला कह्यात घेतले आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी दिली. संबंधित इमारतीत ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ नसल्याने पोलिसांसमोर संशयिताला कह्यात घेणे एक आव्हान होते. पोलिसांना आजूबाजूच्या काही खासगी आस्थापनांतील ‘सीसीटीव्ही फूटेज’ मिळाल्याने पोलिसांना काही धागेदोरे सापडले, तसेच जीवन कामत यांच्या भ्रमणभाषवर आलेल्या काही संदेशांच्या आधारावर पोलिसांनी संशयित महादेव घाडी याला त्याच्या रहात्या घरातून कह्यात घेतले. खून करतांना संशयिताने घातलेल्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याने पोलिसांनी ते कपडे त्याच्या घरातून कह्यात घेतले आहेत. या खून प्रकरणात वापरण्यात आलेला कोयताही पोलिसांनी कह्यात घेतला आहे. संशयित महादेव घाडी याने खुनाची स्वीकृती दिली आहे.

फोंडा पोलिसांनी गेल्या २ वर्षांत एकूण ५ खुनांचा २४ घंट्यांत छडा लावला

फोंडा पोलिसांनी गेल्या २ वर्षांत एकूण ५ खुनांचा २४ घंट्यांच्या आत छडा लावला आहे. ढवळी बगलमार्गावरील २ ट्रकचालकांचे खून प्रकरण, शिरोडा येथील २ शेजार्‍यांमधील भांडणामुळे झालेले खून, बायताखोल-बोरी येथील नेपाळी युवतीचा खून, कुंडई येथे एकाचा सख्ख्या भावाने केलेला खून आणि १६ ऑक्टोबरचे दुहेरी खून प्रकरण या सर्व प्रकरणांचा २४ घंट्यांच्या आत पोलिसांनी छडा लावला आहे. यासाठी फोंडा पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

काणकोण येथील खून प्रकरणी संशयित पोलिसांच्या कह्यात

१६ ऑक्टोबर या दिवशी ३३ वर्षीय पत्नी सोनिया मोन्तेरो इ परेरा हिची बंदुकीची गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी काणकोण पोलिसांनी पती आल्फ्रेड परेरा (वय ४३ वर्षे) याला कह्यात घेतले आहे. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून हा खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आल्फ्रेड परेरा याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे आणि त्याने खुनासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

फोंडा पोलीस ठाण्याच्या भोवती ‘सीसीटीव्ही’ आहेत; मात्र शहरात एकाही ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे नाहीत !

सतत वर्दळ असलेल्या फोंडा शहरात एकाही ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे कार्यान्वित नाहीत. यामुळे पोलिसांनी अन्वेषणासाठी खासगी हॉटेल, अधिकोष आदींच्या ‘सीसीटीव्ही फूटेज’वर अवलंबून रहावे लागत आहे. फोंडा पोलीस ठाण्यात हल्लीच ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.