नगर जिल्ह्यातील २१ गावांमध्ये १० दिवसांची दळणवळण बंदी जाहीर !

नगर, १६ ऑक्टोबर – राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अल्प होत आहे; मात्र नगर जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत नाही. १० दिवसांपूर्वी ६९ गावांमध्ये दळणवळण बंदी होती. त्यातील ६१ गावांची परिस्थिती सुधारल्याने तेथील दळणवळण बंदी उठवली आहे; मात्र ८ गावांमध्ये अद्यापही रुग्ण असल्याने तेथे ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ (प्रतिबंधित विभाग) जाहीर केले आहे. रुग्णसंख्या वाढलेली आढळून आलेल्या १३ गावांमध्ये २३ ऑक्टोबरपर्यंत नव्याने दळणवळण बंदी लावण्यात आली असून जिल्ह्यात एकूण २१ गावांमध्ये अद्यापही दळणवळण बंदी लागू आहे.

२० हून अधिक उपचाराधीन रुग्ण असलेल्या गावात उपाययोजना कडक करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये ‘कंटेनमेंट झोन’ जाहीर करणे, बॅरिकेड्स लावणे, पोलीस बंदोबस्त वाढवणे, जनता जमावबंदी या माध्यमातून गाव बंद करणे, लसीकरण करणे, चाचण्या वाढवणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली आहे.