हा भगवा ध्वज हिंदु धर्मातील एकता आणि समानता यांचे प्रतीक म्हणून उभारत आहोत ! – रोहित पवार, आमदार
कर्जत (नगर), १६ ऑक्टोबर – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील शिवपट्टण किल्ल्यात आतापर्यंतचा सर्वांत उंच भगवा ध्वज उभारला आहे. ‘७४ मीटर उंचीचा हा ध्वज हिंदु धर्मातील एकता आणि समानता यांचे प्रतीक म्हणून उभारत आहोत, त्याचसमवेत हा भगवा ध्वज उभारण्यास शरद पवार यांचीही संमती आहे’, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
वर्ष १७९५ मध्ये शिवपट्टण किल्ल्यात निजाम आणि मराठे यांच्यामध्ये लढाई होऊन मराठ्यांचा विजय झाला होता. त्यानंतर हा किल्ला फलटणच्या निंबाळकरांच्या कह्यात गेला आणि त्यांनी या किल्ल्याची डागडुजी केली; मात्र गेली अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षित होता. आता उंच ध्वजामुळे तो प्रकाशझोतात येणार आहे.