‘आई राजा उदो उदो’चा गजर : संबळाच्या कडकडाटात आणि कुंकवाच्या मुक्त उधळणीत श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन !

पुजारी-भाविक यांसह मानकर्‍यांमध्ये अभूतपूर्व उत्साह, मातेची श्रमनिद्रा चालू !

तुळजापूर, १६ ऑक्टोबर – संबळाच्या कडकडाटात आणि ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात १५ ऑक्टोबर या दिवशी पहाटे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीचा सीमोल्लंघन सोहळा पार पडला. या वेळी कुंकवासमवेतच फुलांची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर श्री तुळजाभवानीदेवी श्रमनिद्रेसाठी नगरहून आलेल्या पलंगावर विसावली. ५ दिवसांच्या श्रमनिद्रेनंतर २० ऑक्टोबर या दिवशी पहाटे म्हणजे आश्विन पौर्णिमेच्या दिवशी श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर विराजमान होईल.

१५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ५.३० वाजता श्री तुळजाभवानीदेवीची मूर्ती सीमोल्लंघन सोहळ्यासाठी पालखीत ठेवण्यात आली. त्यानंतर ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात आणि संबळाच्या कडकडाटात पालखीतून प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा घालण्यात आली. या वेळी प्रदक्षिणा मार्गावर पिंपळाच्या पारावर श्री तुळजाभवानीदेवी काही काळ विसावली. पारावर देवीला नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात आल्या. विसाव्यानंतर पुन्हा प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. या वेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवांसह पुजारी, मानकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२० ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी शिवलाड तेली समाजाच्या काठ्यांसह छबिना मिरवणुकीनंतर, तसेच महंतांच्या जोगव्यानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होईल. ‘मंचकी निद्रे’च्या कालावधीत चरणतीर्थ पूजा, प्रक्षाळपूजा, दोन्ही वेळच्या अभिषेक पूजा, नैवेद्य आदी श्री तुळजाभवानीदेवीचे सर्व धार्मिक विधी पलंगावर करण्यात येतात. ‘मंचकी निद्रे’च्या कालावधीत तुळजाभवानीदेवीला सुवासिक तेलाने अभिषेक घालण्यात येतो.