भाविकांनी शंखवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा केला संकल्प !
शंखवाळी (सांकवाळ), १६ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र रक्षा समिती’, शंखवाळ (सांकवाळ), मुरगाव यांच्या वतीने शंखवाळ येथील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या श्री. सचित नाईक यांच्या निवासस्थानी नवरात्रोत्सव आणि दसरा भक्तीभावाने अन् उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे शंखवाळ येथील तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा आणि तीर्थक्षेत्राला पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून देण्याचा संकल्प भाविकांनी या वेळी केला.
नवरात्रोत्सवाच्या काळात ९ दिवस आरती आणि हवन असा धार्मिक कार्यक्रम झाला, तर दसर्याच्या दिवशी दुपारी ३ वाजता ढोलताशांच्या गजरात श्रींची शंखवाळ तीर्थक्षेत्र या स्थळी मिरवणूक काढण्यात आली आणि झुवारी नदीत (अघनाशिनी नदीत) श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी समस्त हिंदूंनी सहकार्य करण्याचे आवाहन
नव्याने स्थापन झालेल्या ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ने पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी, तसेच तीर्थक्षेत्री इतर धर्मियांच्या अनधिकृत कृत्यांना सनदशीर मार्गाने आळा घालण्यासाठी समस्त हिंदूंनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.