पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – भारताने वर्ष २०१६ मध्ये सीमारेषेबाहेर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाचा भारताकडे पहाण्याचा दुष्टीकोन पालटला. उरी येथील आतंकवादी आक्रमणात भारतीय सैनिक हुतात्मा झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी तळांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला होता. यामुळे ‘आतंकवाद्यांना भारतात घुसणे सोपे नाही’, असा संदेश जगाला दिला गेला, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धारबांदोडा येथील ‘नॅशनल फॉरेन्सिक सायन्स’ (राष्ट्रीय न्यायवैद्यक) विद्यापिठाच्या संकुलाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या वेळी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले, ‘‘स्व. मनाहेर पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री असतांना ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला. स्व. पर्रीकर हे ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना (सैन्यातील एका पदावरील व्यक्तींना निवृत्तीचे वर्ष वेगळे असले, तरी समान निवृत्तीवेतन देण्याची योजना) आणि वर्ष २०१६ मधील ‘सर्जिकल स्ट्राईक’ यांमुळे लोकांच्या सदैव आठवणीत रहातील. ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना राबवून स्व. पर्रीकर यांनी कठीण परिस्थितीत देशाची सेवा करणार्या सैनिकांच्या त्यागाला योग्य न्याय दिला आहे. स्व. पर्रीकर यांनी गोव्याचाही सर्वांगीण विकास केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही स्व. पर्रीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोव्याचा विकास करत आहेत.
२ दिवसांच्या गोवा भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोर्ट ब्लेअरला मार्गस्थ
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २ दिवसांच्या गोवा भेटीनंतर पोर्ट ब्लेअर (अंदमान- निकोबार बेटांवरील प्रशासकीय केंद्र) येथे मार्गस्थ झाले. गोवा भेटीत त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत आणि आमदारांसमवेत बैठका घेतल्या. या वेळी भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवि उपस्थित होते. गोवा भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याचा विकास आणि प्रगती यांसाठी सर्वांनाच प्रेरणा दिल्याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अमित शहा यांचे आभार मानले.