नगर – राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केलेल्या कामांची कोट्यवधी रुपयांची देयके थकली आहेत. दिवाळीपर्यंत थकीत रक्कम मिळाली नाही, तर राज्यात चालू असलेली विकासकामे आहे त्या स्थितीत बंद केली जातील, अशी चेतावणी ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने राज्य सरकारला दिली आहे. थकीत देयकांची रक्कम मिळावी, यासाठी त्यांचे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? – संपादक)
नगर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ६९५ कोटी रुपयांची तर ग्रामसडक योजनेकडे १२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. याचा परिणाम म्हणून बँकेच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यावरील व्याज वाढत असून कामगारांचे पगार देणे कठीण झाले आहे. यंत्रणेची इंधन देयके आणि पुरवठादार यांची देणी थकल्याने कंत्राटदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीपूर्वी सर्व कंत्राटदारांची प्रलंबित देयके न मिळाल्यास विकासकामे आहे त्या स्थितीत थांबवणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. नगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस्.डी. पवार आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता एच्.एन्. सानप यांना यासंदर्भातील निवेदन दिले.