तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या एका नातेवाइकाचे बोलणे आणि त्यातून साधना, सेवा अन् सनातन संस्था यांना सातत्याने केला जाणारा विरोध !

‘आमच्या एका नातेवाइकांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यांचे त्या वेळचे बोलणे येथे दिले आहे. ते वाचून त्यांच्या आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेची कल्पना येते.

१. ‘सेवेविना जगू शकत नाही’, असे साधिका आणि संत यांनी म्हटलेले सहन न होणे

ते नातेवाईक म्हणतात,

अ. ‘‘मी येथे एका वसाहतीत रहायला येऊन ५ वर्षे झाली; पण माझ्या साधक-नातेवाइकांनी मला कुणाशीही बोलू दिले नाही. त्यांना त्याविषयी काहीच वाटत नाही. प्रत्येक वेळी त्यांना सेवाच महत्त्वाची वाटते. ते म्हणतात, ‘‘मी सेवेविना जगू शकत नाही.’’

आ. एका संतांचे आई-वडील इकडे आले होते. तिची आई भ्रमणभाषवर बोलत असतांना मी ऐकले. (नातेवाइकाच्या घराच्या खाली एक घर आहे. तिथे त्या संतांचे आई-वडील रहात होते. त्यामुळे येता-जाता नातेवाइकांना ते दिसायचे.) त्या संतांची आई कुणाला तरी भ्रमणभाषवर सांगत होती, ‘‘ते संतही म्हणतात, ‘मी सेवेविना जगू शकत नाही.’’ हे काय विचित्र आहे ! आई-वडील इथे आहेत, तर त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको का ? मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे आणि तीच तुम्ही करत नाही.

२. ‘साधक’ हा शब्द वापरलेला न आवडणे आणि ‘सज्जन’ अन् ‘दुर्जन’ हे शब्दच वापरणे

तुमचे रामराज्य येणारच आहे; पण मी त्या वेळी नसेन. तुम्ही हिंदु राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करत आहात. मला कुणाला अडवायचे नाही. मी आतापर्यंत कुणालाही त्रास दिला नाही आणि माझ्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये. (‘प्रत्यक्षात नातेवाइकांना अनिष्ट शक्तीचा तीव्र त्रास असल्याने आतापर्यंत त्यांच्या वागण्याच्या आणि बोलण्याच्या माध्यमातून कुटुंबियांना पुष्कळ त्रास झाला आहे.’ – संकलक) मी काय वाईट आहे का ? (हा प्रश्न २-३ वेळा विचारला.) सर्वच माणसे काही वाईट नसतात. मला सज्जन माणसे आवडतात. माझी वृत्ती उपजतच सात्त्विक आहे. त्यामुळे मी दुर्जनांशी बोलायला जाणार नाही. समर्थ रामदासस्वामींच्या ग्रंथात ‘सज्जन’ हाच शब्द आहे. ‘साधक’ हा शब्द नाही. त्यामुळे तो शब्द कुठून आला ? मला तुमचे विषय पटत नाहीत. (‘नातेवाइकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला ‘साधक’ या शब्दातील चैतन्य सहन न झाल्याने त्या शब्दाच्या विरोधात ती बोलत होती.’ – संकलक)

मी पूर्वी जेथे रहायचे, तेथील लोक पुष्कळ चांगले आहेत. ते सर्व जण कर्मकांड करतात; पण त्यांना तुमचे (सनातनचे) विषय पटणार नाहीत. मलाही त्यांच्यात रहायला आवडायचे. सगळे जण तुमचे हे (साधना) करणारे नसतात; पण ते सज्जन असतात.

३. आधुनिक पद्धतीचे पोशाख आणि काळ्या रंगाचे कपडे यांचे समर्थन करणे

मी पहिल्यापासूनच सात्त्विक, चांगले कपडे घालायचे. माझे मन चांगले आहे. माझ्याकडील काळ्या रंगाचा एक पंजाबी पोशाख पुष्कळ चांगला होता. माझ्या साधक असलेल्या नातेवाइकाला मुलींनी शर्ट-पँट, तोकडे कपडे घातलेले आवडत नाहीत; पण आताच्या काळानुसार त्या मुली तसे घालणारच आणि तसे रहायलाच हवे. एका महिलेची सून काळ्या रंगाचे कपडे घालते; पण तिचे मन चांगले आहे. (‘नातेवाइकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला ती सून आवडते; कारण ती साधना करत नाही.’ – संकलक)

४. क्षुल्लक गोष्टींवरून घातलेला वाद

अ. साधक-नातेवाइकाचे यजमान त्यांना होणार्‍या शारीरिक त्रासामुळे तोल जाऊन बर्‍याचदा पडायचे. तेव्हा साधक नातेवाइकाने त्यांच्याकडे २४ घंटे लक्ष ठेवायला पाहिजे होते.

आ. जेव्हा साधक-नातेवाइकाच्या सुनेचे आई-वडील यायचे, तेव्हा मला त्यांच्याशी बोलायला आवडायचे; पण साधक-नातेवाईक मला त्यांच्याशी बोलू द्यायचे नाहीत. (‘प्रत्यक्षात साधक-नातेवाइकाच्या सुनेच्या आई-वडिलांशी ते पुष्कळ बोलायचे.’ – संकलक)

इ. तुम्ही सर्वांनी इथे थांबून माझे सगळे करा. सेवा करायची नाही आणि भ्रमणभाषही उचलायचा नाही. तुमच्या डोक्यात तुमचे (सेवेचे) विषय असतात. मला तसे नको. मला ते आवडत नाही.

५. स्वतःला मानसिक त्रास असल्याचे सांगणे आणि कोरोनामुळे येणार्‍या मृत्यूविषयी बोलून टोकाचे विचार व्यक्त करणे

सध्या माझी स्थिती मानसिक ताणामुळे बिघडली आहे, अन्यथा गरम जेवण जेवूनही ते अंगाला कसे काय लागत नाही ? मला मानसिक त्रास होत आहे. मी आता माझे घर आणि अन्य सामान विकणार आहे. मी अन्य ठिकाणी निघून जाईन. तेथे कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. मीपण मरीन. आता आपला संबंध संपला. आम्हाला आता आजचा शेवटचा दिवस असे समजून शेवटचे जेवण द्या.’’

६. त्या नातेवाइकांनी ‘तुम्ही माझ्याकडे मुळीच यायला नको’, असे साधक-नातेवाइकाला ठणकावून सांगितले.’ (‘साधक-नातेवाइकाची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असल्याने अनिष्ट शक्तीला ते सहन होत नाही. त्यामुळे ते साधक नातेवाइकाच्या संपर्कात येण्याचे टाळतात.’ – संकलक)

– एक साधिका (३.१०.२०२०)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.