देहली येथील सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी एका तरुणाची अमानुष हत्या !

शिखांचा धर्मग्रंथ ‘श्री गुरु ग्रंथ साहिब’ची विटंबना केल्याच्या आरोपावरून हत्या

कुराण, श्री गुरु ग्रंथ साहिब आदींचा अवमान झाल्यावर थेट कायदा हातात घेतला जातो, तर हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा अवमान होऊनही सारे कसे शांत असते ! हिंदूंनी वैध मार्गाने जरी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा विरोध दाबला जातो ! आता या घटनेविषयी मात्र सर्वच निधर्मी आणि पुरो(अधो)गामी शांत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक

नवी देहली – गेल्या काही मासांपासून देहलीच्या सिंघू सीमेवर शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. याठिकाणी शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ‘श्री गुरु ग्रंथ साहिब’ची विटंबना केल्याच्या आरोपावरून एका शिखाने एका व्यक्तीची आधी हात आणि पाय कापून नंतर त्याची हत्या केली. शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या मुख्य स्थळाच्या बॅरिकेडवर तरुणाचा मृतदेह टांगण्यात आलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत युवक अमृतसरमधील तरण तारण येथील असल्याचे सांगितले जात आहे. शीख योद्धा समूह म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘निहंगा’ समुहावर या तरुणाच्या हत्येचा आरोप आहे. या हत्येचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागला; परंतु या परिस्थितीतही प्रसंगावधान राखत पोलिसांनी मृतदेह कह्यात घेतला, तसेच अज्ञात मारेकर्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.