शक्तिदेवता !

नवरात्रीनिमित्त प्रतिदिन वाचा विशेष सदर…

कमळावर बसलेली श्री सिद्धिदात्रीदेवी

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय ! सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेत आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया. १३ ऑक्टोबरला आदिशक्तिदेवीच्या ‘महागौरी’ रूपाची वैशिष्ट्ये आणि तिचे कार्य यांविषयी माहिती पाहिली. आज त्या पुढील माहिती पाहूया.

नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे ‘सिद्धिदात्री’ रूप !

आश्विन शुक्ल पक्ष नवमी, महानवमी (१४.१०.२०२१)

श्री. विनायक शानभाग

अष्टमहासिद्धी प्राप्त असलेली आणि भक्तांच्या लौकिक अन् पारलौकिक इच्छा पूर्ण करणारी देवी सिद्धिदात्री ! : ‘नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व या ८ सिद्धी आहेत. या सिद्धी प्रदान करणारी ती ‘सिद्धिदात्री !’ देवीपुराणानुसार देवी सिद्धिदात्रीच्या कृपेने शिवाने या ८ सिद्धी प्राप्त केल्या आणि तिच्याच कृपेने शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे शिवाला ‘अर्धनारीश्वर’ असे नाव पडले. देवी कमळावर बसलेली असून ती चतुर्भुज आहे. श्री सिद्धिदात्रीदेवी भक्ताच्या लौकिक आणि पारलौकिक दोन्ही इच्छा पूर्ण करते. सर्व भक्त ईश्वरप्राप्तीची इच्छा करतील, असे नाही. ज्याला सिद्धीप्राप्तीची इच्छा आहे, त्याला सिद्धिदात्रीदेवी सिद्धी प्रदान करते आणि ज्याला अष्टसिद्धींचा स्वामी असणारा ‘ईश्वर’ पाहिजे आहे, त्याला ती ईश्वराची प्राप्ती करून देते, म्हणजे ती मोक्षदायिनी आहे. अशा मोक्षदायिनी सिद्धिदात्रीदेवीच्या चरणी कोटीशः नमन !

प्रार्थना

‘हे देवी सिद्धिदात्री, आम्हा साधकांना लौकिकाची कामना नाही; मात्र आम्हा साधकांना गुरुचरणांची इच्छा आहे. हे देवी, आम्हा साधकांमध्ये गुरुभक्तीची इच्छा निर्माण करणारी तूच आहेस. आम्हा साधकांचा जन्म गुरुसेवेसाठीच झाला आहे. ‘आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत अधिकाधिक गुरुसेवा घडो’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), बेंगळुरू (२६.९.२०२१)


महामाया आदिशक्तीला शरण जाणे, हाच एकमेव मार्ग असणे !

१. ‘मनुष्य रूपातील देवता किंवा असुर यांना ओळखता न येणे’, हीसुद्धा आदिशक्तीची योगमाया असणे

आज आपण कलियुगात आहोत. अन्य युगांच्या तुलनेत हे युग जड आहे आणि अधिक स्थूल आहे. या युगात भगवंताने मनुष्य रूपात अवतार घेतला किंवा असुर मनुष्य रूपात आले, तरी ते कळणे अशक्य आहे. आदिशक्तीची योगमाया एवढी प्रबळ आहे की, ‘मनुष्य रूपातील देवता आणि असुर यांना ओळखणे अशक्य आहे. असे असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, हे तरी मनुष्याला कसे कळेल ? ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रूपात साक्षात् आदिशक्ति प.पू. गुरुदेवांच्या शिष्य म्हणून जन्माला आल्या आहेत’, हे तरी कसे कळेल ? हीच तर योगमाया आहे.

वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरुदेव साक्षात् श्रीमन्नारायण आहेत’, हे सनातनच्या काही साधकांना अंतरातून ठाऊक आहे; मात्र ते व्यक्त करता येत नाही किंवा त्याचे प्रमाणही देता येत नाही.’ हीच योगमाया आहे.

‘आदिशक्तीने श्रीमन्नारायणाचे शिष्य म्हणून जन्म का घेतला ?’, हे एक कोडेच आहे. आता माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही; कारण हे आदिशक्तीचे कोडे आहे. देवीची इच्छा असेल, तेव्हा वेळ आल्यावर ती जगन्माता हे कोडे सोडवेल आणि श्रीमन्नारायणस्वरूप गुरु अन् आदिशक्तीस्वरूपा त्यांच्या शिष्या यांच्या जन्माचा कार्यकारणभाव आपल्या सर्वांना कळू शकेल.

२. आदिशक्ति म्हणजे भगवंताचे शक्तिस्वरूप असून त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे कार्य अव्याहत चालू असणे

आदिशक्तीच्या संदर्भातील वरील लिखाणांतून ‘आदिशक्तीविना आपले अस्तित्व नाही’, हे लक्षात येईल. थोडक्यात सांगायचे झाले, तर आदिशक्ति म्हणजे भगवंताची शक्ति आहे. तिच्यामुळे भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीचे चक्र चालू रहाते. जसे अग्नी आणि अग्नीची दाहकशक्ती एकच आहेत, तसे भगवंत अन् त्याची शक्ती एकच आहेत. निर्गुण भगवंताचे सगुणत्व शक्तीमुळे आहे. त्रिगुणांच्या आधारे आदिशक्तीच सर्व कार्य करते आणि सर्वांकडून कार्य करवून घेते. भले ते देव असोत, दानव असोत किंवा मनुष्य असोत. या सर्वांकडून होणारे कार्य आदिशक्तीच्या कृपेमुळेच होत असते.

३. सर्वकाही आदिशक्तीच्या इच्छेने होत असल्याने तिला शरण जाणे, हाच एकमेव मार्ग असणे

काही जणांना प्रश्न पडतो, ‘सर्वकाही आदिशक्तीच्या इच्छेने होते, तर आपण का धडपडावे ? आपण का कार्य करावे ?’, याचे उत्तरही ‘आदिशक्ती’च आहे. ‘आपण गप्प बसू’, असे म्हटले, तरी आपण गप्प बसूच शकत नाही. येनकेन प्रकारेण आदिशक्ति आपल्या सर्वांकडून कार्य करवून घेतेच. ‘कर्म करत रहाणे आणि आदिशक्तीला शरण जाणे’, एवढेच आपण करू शकतो. ‘मी कर्मच करणार नाही’, असे म्हणणे अयोग्य आहे. ‘जे कर्म आपल्याला मिळाले आहे, ते कर्म योग्य प्रकारे करण्याची शक्ती आपल्याला मिळू दे’, अशी त्या जगन्माता आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना आहे.

अशा त्या आदिशक्तीची अनन्यभावाने भक्ती करण्याचे ९ दिवस म्हणजे ‘नवरात्री’ होय ! आदिशक्तीची कृपा सर्वांवर समान असते; मात्र ज्याची जशी भक्ती, तशी त्याला देवीची कृपा प्राप्त होते.

कृतज्ञता

या नवरात्रीनिमित्त मला हे लिखाण करण्याची प्रेरणा देणारी आणि ते करवून घेणार्‍या आदिशक्ति जगदंबेच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. महर्षि व्यासांनी लिहिलेल्या श्रीमद्देवीभागवत पुराणामुळे आणि अन्य शक्तीउपासकांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लिखाणातून हे सर्व लिखाण करता आले; म्हणून त्यांच्या चरणी मी कृतज्ञ आहे. गुरुदेवांच्या कृपेने हे सर्व मला शब्दबद्धही करता आले. गुरुदेवांच्या कृपेने हे सर्व लिखाण करत असतांना माझी आदिशक्तीविषयी श्रद्धा वाढली आणि मला तिच्याविषयी प्रेम वाटू लागले. आदिशक्तीविषयी भक्तीभाव निर्माण करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

‘आदिशक्तीच्या संदर्भात असे पुष्कळ लिखाण त्यांनीच माझ्याकडून करवून घ्यावे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), बेंगळुरू (२६.९.२०२१)