महापालिकेकडून विद्यार्थ्यांना ‘टॅब’समवेत संकेतस्थळाची सुविधा मिळणार !

तिजोरीत खडखडाट असतांना ४० लाख रुपयांची तरतूद !

शाळा चालू झाल्यानंतरही ‘ऑनलाईन’वर खर्च करण्याचा निर्णय कशासाठी ? – संपादक 

नागपूर – महापालिकेच्या इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेने ‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘टॅबलेट’ दिले होते. आता या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी संकेतस्थळाची सुविधाही दिली जाणार आहे. प्रत्यक्ष शाळा चालू होत असतांना  महापालिका मात्र ‘ऑनलाईन’ शिक्षणावर ४० लाख रुपये व्यय करणार आहे. विशेष म्हणजे ‘शहरातील महापालिकेसह अन्य शाळा चालू होत असतांना आणि विद्यार्थी शाळेत येत असतांना ‘ऑनलाईन’ सुविधा देण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. (विरोधकांनी विचारलेला प्रश्न योग्य आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतांना कारण नसतांना ४० लाख रुपये व्यय करणे हे अयोग्य आहे. शाळा प्रत्यक्ष चालू झाल्यानंतर विद्यार्थी या ‘टॅब’चा वापर चित्रपट आणि ‘गेम’ खेळण्यासाठी करण्याची शक्यता आहे. याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल. त्यामुळे याचा नगरसेवक, पदाधिकारी आणि आयुक्त यांनी विचार करून हा निर्णय रहित करावा. – संपादक) 

कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून सुरेश भट सभागृहासह महापालिकेची सर्व सभागृहे बंद आहेत. या काळात ज्या सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांनी सभागृहाचे आरक्षण करण्यासाठी पैसे भरले होते, ते सर्व पैसे संबंधित संस्थांना परत मिळणार आहेत. प्रचलित नियमानुसार रहित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे आरक्षण शुल्क दिले जात नाही; मात्र महापालिका प्रशासनाने शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आणि स्थायी समितीने त्याला संमती दिली आहे.