सोलापूर, १२ ऑक्टोबर – महापालिकेतील कर्मचारी आणि कामाच्या निमित्ताने येणारे नागरिक यांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच महापालिकेत प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांनी आतापर्यंत एकही डोस घेतलेला नाही त्यांच्यावर कारवाई करून महापालिका परिसरात लसीकरणाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
धनराज पांडे पुढे म्हणाले की, शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४२ टक्के लोकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. २ डोस घेऊन सुरक्षित झालेल्या नागरिकांची संख्या केवळ २५ टक्के आहे. विविध माध्यमांतून लसीकरणाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला, तरीही लसीकरणास नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आता ‘मिशन कवचकुंडल’ अंतर्गत सोलापूर शहरातील व्यापारी संकुले, खासगी आस्थापनातील कर्मचारी यांची पडताळणी करण्यात येत आहे.