नैतिकतेचा कडेलोट !

नोंद 

एकाच आठवड्यात तीन वेगवेगळ्या घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. विविध घटनांमध्ये संयम सुटल्यावर तीन पित्यांनी स्वत:च्या लहान मुलांच्या हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पहिल्या घटनेत पित्याने कौटुंबिक वादातून स्वत:च्या ६ वर्षांच्या मुलाची हत्या केली होती, तर इचलकरंजी येथे मुलाच्या उपचाराचा व्यय परवडत नसल्याच्या कारणावरून पित्याने स्वत:च्या ५ वर्षांच्या मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची घटना घडली. तिसर्‍या घटनेत भांडण केलेल्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वत:च्या ३ वर्षांच्या मुलीला चादरीत गुंडाळून जमिनीवर आपटून खून केल्याची घटना जालना जिल्ह्यातील केहाळ वडगाव येथे घडली आहे. या वेगवेगळ्या उदाहरणांवरून वैज्ञानिक युगात प्रगती केलेला मनुष्य इतका निर्दयी आणि क्रूर बनत आहे की, स्वार्थापोटी कोवळ्या मुलांची हत्या करण्यापर्यंत त्याची मजल जात आहे, हे दुर्दैवी अन् गंभीर आहे.

पूर्वीच्या काळी माता-पिता जसे आदर्श होते, तसेच त्यांची मुलेही आदर्श होती. माता-पिता मुलांवर योग्य संस्कार करत आणि मुलांचे आचरणही त्याप्रमाणे होते. सामान्य नागरिकांनाही धर्म-अधर्माची योग्य जाण होती आणि पाप-पुण्य म्हणजे काय, ते कळत होते. यामुळेच एखादी चुकीची कृती करण्यास तो सहजासहजी धजावत नसे. योग्य संस्कार असल्याने स्वत:चे लहान मूल खाली आहे, हे समजल्यावर कठीण गड खाली उतरून त्या मुलासाठी जीव धोक्यात घालणारी ‘हिरकणी’सारखे आदर्श पालक शिवछत्रपतींच्या काळात होते. आजकाल समाजात स्वत:च्या रागावर ताबा कसा मिळवावा, कौटुंबिक विवंचनेस सामोरे कसे जायचे, येणार्‍या विविध अडचणींमध्ये देवाचे साहाय्य कसे घ्यायचे, याचे कोणतेच शिक्षण मिळत नाही. त्यामुळे समाजाची स्थिती भरकटल्यासारखी झाली आहे. त्यातूनच मनुष्य स्वत:च्या मुलाची हत्या करण्यापर्यंत पाऊल उचलत आहे.

शासनकर्ता धर्मपालन करत नसेल, तर प्रजाही धर्मपालन करत नाही, असे असल्याने त्याप्रमाणेच सध्या समाजात घडत आहे. समाजाला धर्मशिक्षण मिळावे, तो नीतीसंपन्न आणि चारित्र्यवान व्हावा, यासाठीची शिक्षणप्रणालीही सध्या नाही. त्यामुळे मनुष्य त्याची सदसद्विवेकबुद्धी हरवून त्याच्या मनाला योग्य वाटेल, ती कृती सध्या करत आहे. त्यातूनच अशा घटनांची वारंवारता वाढत आहे. या सर्वांवर ‘साधना करणारा समाज’, हेच उत्तर असून त्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती अपरिहार्य आहे !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर