परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करवून घेतलेली आदिशक्तीची उपासना !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या आश्रमात संत आणि सद्गुरु यांच्याकडून ‘समष्टी कल्याण अन् हिंदु राष्ट्राची स्थापना’ यांसाठी देवीशी संबंधित अनेक यज्ञ करवून घेऊन साधकांच्या मनात देवीविषयी भक्ती निर्माण करणे

‘सनातन संस्थेची स्थापना झाल्यापासून परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी साधकांकडून गुरुकृपायोगानुसार साधना करवून घेतली. गुरुदेवांनी सांगितलेली साधना केल्याने १,३२८ साधक जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त झाले आहेत आणि ११४ साधक संत झाले आहेत. गेल्या ५-६ वर्षांपासून गुरुदेवांनी संत आणि सद्गुरु यांच्याकडून समष्टी कल्याण अन् हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी अनेक यज्ञ-याग करवून घेतले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात देवीशी संबंधित अनेक याग झाले आहेत. त्यामध्ये चंडियाग, राजमातंगी होम, बगलामुखी होम, चामुंडा होम, प्रत्यंगिरा होम प्रमुख आहेत. गुरुदेवांनी आश्रमात हे सर्व होम करवून घेतल्यामुळे साधकांच्या मनामध्ये देवीविषयी भाव निर्माण झाला आणि त्यांना देवीविषयी प्रेम वाटू लागले. थोडक्यात सांगायचे झाले, तर गुरुदेवांनी या माध्यमातून साधकांकडून देवीची उपासना करवून घेतली.

२. वर्ष २०१९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने कर्नाटक येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवी रामनाथी आश्रमात येणे आणि तिने साधकांना आशीर्वाद देणे

आजपर्यंत आश्रमात रहाणार्‍या आणि प्रसारातील सहस्रो साधकांना देवीविषयी अनुभूती आल्या आहेत आणि होमाग्नीमध्ये देवीचे दर्शन झाले आहे. वर्ष २०१९ मध्ये गुरुदेवांच्या कृपेनेच कर्नाटक येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवी रामनाथी आश्रमात आली आणि तिने साधकांना आशीर्वाद दिला. आम्हा साधकांकडून अनेक प्रकारे आदिशक्तीची उपासना करवून घेणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

– श्रीदुर्गासप्तशति, अध्याय ५, श्लोक ६५

अर्थ : जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये दयारूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.’

– श्री. विनायक शानभाग, बेंगळुरू (२५.९.२०२१)