(म्हणे) ‘तैवान चीनचाच भूभाग असल्याने या प्रकरणी कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही !’ – चीनची चेतावणी

चीन अशा प्रकारची दादागिरी करणार असेल, तर सर्व जगाने आणि संयुक्त राष्ट्रांनी चीनवर बहिष्कार घातला पाहिजे ! – संपादक

डावीकडे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग-वेन

बीजिंग (चीन) – चीनने तैवानच्या सूत्रावर इतर देशांना चेतावणी दिली आहे. ‘तैवान स्वत:ला स्वतंत्र देश म्हणत असला, तरी तो चीनचाच भूभाग आहे. तैवानच्या प्रश्‍नावर इतर देशांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. तैवानवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रसंगी सैन्यबळही वापरू’, असे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केलेले वक्तव्य हे अमेरिकेलाच धमकी असल्याचे म्हटले जात आहे. मागील वर्षभरापासून तैवानच्या सूत्रावर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या जवळपास १५० लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई सीमेमध्ये घुसखोरी केली होती. त्यानंतर तैवान आणि अमेरिका यांनी चिंता व्यक्त केली. ‘चीनने तैवानवर आक्रमण केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील’, अशी चेतावणी तैवानने दिली होती.