प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.): अन्वेषणातील महत्त्वाचा घटक !

सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक 

१. प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्याची प्रक्रिया !

अ. ‘तक्रारदाराने दखलपात्र गुन्ह्याविषयी तक्रार दिल्यानंतर पोलीस प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्आयआर्) नोंद करून घेतात. त्यानंतर तक्रारदाराला नियमाप्रमाणे त्याची प्रत देतात. त्याचप्रमाणे ज्या न्यायालयाच्या क्षेत्रात हा गुन्हा घडलेला आहे, तेथील न्यायालयालाही (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍याला) ही प्रत पाठवली जाते. त्यानंतर पोलीस अन्वेषण चालू करतात, पुरावे गोळा करतात आणि आरोपीला अटक करतात.

आ. ज्या कलमान्वये गुन्हा नोंदवलेला आहे, त्याच्या अनुषंगाने आरोपीच्या सहभागाविषयी पुरावे गोळा केले जातात. त्यानंतर पंचनामे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तज्ञांचे अहवाल, तांत्रिक, भौतिक इत्यादी सर्व पुरावे गोळा करून संबंधित न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र प्रविष्ट केले जाते. यामध्ये सायकल चोरीसारखे साधे गुन्हे, हत्या, बलात्कार, बाँबस्फोट, राष्ट्र्रद्रोह, फसवणूक अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

इ. गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्याची योग्य शिक्षा मिळावी आणि कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ही प्रक्रिया पार पाडली जाते.

२. प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवणारा अधिकारी कसा असावा ?

अ. सर्व प्रकारच्या दखलपात्र गुन्ह्यांमध्ये प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंद करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच पोलिसांना गुन्ह्याचे अन्वेषण करता येते.

आ. गुन्ह्याचा प्रथम माहिती अहवाल नोंद करणारा अधिकारी चाणाक्ष, कायद्याची माहिती असणारा, गुन्ह्याचा उद्देश आणि अन्वेषणाची दिशा समजून घेऊन त्याप्रमाणे माहिती उद्धृत करणारा, प्रत्येक शब्द आणि अक्षर यांचे न्यायालयीन सुनावणीत महत्त्व जाणणारा, संभाव्य गुन्हेगाराविरुद्ध पुरावा निर्माण करणारी भाषा वापरणारा अन् फिर्यादी, साक्षीदार किंवा पंच फितूर झाल्यास त्यांना त्यांच्या घेतलेल्या साक्षीमध्ये अडकवणारे शब्द वापरणारा असा असावा.

इ. तक्रार प्रविष्ट करून घेणारा पोलीस अंमलदार मोठ्या शहरांमध्ये किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा असतो. जिल्ह्याच्या ठिकाणी (ज्या ठिकाणी पोलीस अधीक्षक प्रभारी असतात) साहाय्यक पोलीस फौजदार किंवा पोलीस हवालदार असू शकतात.

३. काही विशेष (राष्ट्र आणि धर्म यांविरुद्ध) गुन्ह्यांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची परिपूर्ण तक्रार कशी प्रविष्ट करावी ?

अ. तक्रार : न्यूनतम शब्दांमध्ये; पण महत्त्वाची सूत्रे स्पष्ट करणारी असावी. तक्रारदाराने स्वतःचे नाव, वय, व्यवसाय आणि संपूर्ण पत्ता यांसहित त्यांचा भ्रमणभाष क्रमांक अन् पर्यायी संपर्क क्रमांक देण्यास विसरू नये.

आ. शारीरिक गुन्ह्यामध्ये (मारहाण) तक्रार प्रविष्ट करतांना आपण (तक्रारदार) घटनास्थळी उपस्थित असण्याचे कारण थोडक्यात लिहावे. त्या ठिकाणी आपण नियमित उपस्थित रहात असल्यास तसे नमूद करावे. आपण त्याच वेळी त्याच ठिकाणी नियमित उपस्थित असल्याची माहिती असणार्‍या काही लोकांची (नंतर साक्षीदार म्हणून उपयोग होऊ शकतो) नावे नमूद करावीत.

इ. आरोपीला किंवा आरोपींना ओळखत असल्यास ओळख कशी झाली ? आणि ती किती काळापासून आहे ? तेही लिहावे. आरोपींशी वैमनस्य असल्यास त्याचे कारण आणि कालावधी नमूद करावा.

ई. आरोपींशी काही आर्थिक देवाणघेवाण असेल, तर त्याविषयीची कागदपत्रे अथवा पुरावे तक्रारीमध्ये संक्षिप्त वर्णन करून सांगावेत. ते पोलिसांना द्यावेत किंवा तेवढा वेळ नसल्यास ‘आणून देतो’, असे सांगावे.

उ. आरोपींची नावे, त्यांच्या अंगावरील कपडे, त्यांनी शस्त्र वापरले असल्यास त्याचे वर्णन आदी सांगावे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ओळखीच्या लोकांची नावे सांगावी. समजा घटनास्थळ एखादे हॉटेल, कार्यालय किंवा आस्थापन असेल, तर ‘तेथील व्यवस्थापक, वेटर, शिपाई, लिपिक, काउंटरवरील व्यक्ती पहात होते किंवा उपस्थित होते’, असे सांगावे.

ऊ. गुन्हा करतांना आरोपीने  किंवा आरोपींनी आपल्याशी काही वक्तव्य केले असल्यास अथवा धमकी दिली असल्यास तेही सांगावे. आरोपींनी आपसांत संवाद साधल्यास तेही पोलिसांना सांगितले पाहिजे. आरोपी अनोळखी असतील, तर त्यांचे शक्य तेवढे अचूक वर्णन पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करावा. ‘आरोपींना पुन्हा पाहिल्यास मी ओळखू शकेन’, असेही पोलिसांना सांगावे.

ए. आरोपींचे एखादे शारीरिक व्यंग असेल, अंगावरील खाणाखुणा, लकब असेल, तर तेही पोलिसांना सांगू शकतो.

पोलिसांना आरोपींपर्यंत पोचण्यासाठी या सर्व गोष्टी अतिशय उपयुक्त ठरतात. आरोपी आपल्या ओळखीचे नसल्यास गुन्हा करण्याचा उद्देश काय असावा ? याचा अंदाज आपण बांधू शकत असल्यास तसेही पोलिसांना सांगावे.

४. आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी परिपूर्ण गुन्हा नोंदवून घेणारे चतुरस्र पोलीस अधिकारी हवेत !

अ. वरील सर्व गोष्टींची (सूत्र क्रऱ्मांक ३ मधील) पूर्तता करू शकेल, असा पोलीस सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नेहमीच उपलब्ध असू शकेल का ? किंवा त्यांना तसे प्रशिक्षण दिलेले असेल

का ? तर याचे उत्तर ‘नाही’, असेच आहे.

आ. सध्याची न्यायप्रणाली पहाता गुन्हेगाराला परिणामांपर्यंत पोचवण्यासाठी उपरोक्त गोष्टींची (सूत्र क्रऱ्मांक ३ मधील) पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. असे होत नसल्यामुळेच सध्या गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण फारच न्यून होत आहे.

इ. प्रत्येक कायद्यातील पळवाटा शोधणारे आणि त्यांचा वाममार्गाने अवलंब करणारे अधिवक्ते मोठ्या प्रमाणात आहेत. अशा अधिवक्त्यांना शह देऊ शकणारे चतुरस्र पोलीस सदासर्वकाळ सर्व पोलीस ठाण्यामध्ये असू शकत नाहीत.

५. हत्येसारख्या गुन्ह्याची तक्रार कशी प्रविष्ट करावी ?

अ. हत्येसारख्या गुन्ह्यामध्ये उपरोक्त सूत्रे (सूत्र क्रऱ्मांक ३ मधील) आवश्यक असतातच; परंतु त्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी साक्षीमध्ये येणे आवश्यक आहे. असा गुन्हा करण्यामागे काहीतरी हेतू असतोच. त्यामुळे त्याविषयी काही माहिती असल्यास पोलिसांना सांगावी.

आ. मृताविषयी सर्वप्रकारची विस्तृत माहिती पोलिसांना द्यावी. पूर्ववैमनस्य असल्यास आणि त्याविषयी तक्रारी प्रविष्ट असल्यास त्यांचा उल्लेख करावा. संशयितांच्या वागण्या-बोलण्यात नजीकच्या काळात काही पालट दिसल्यास त्याविषयी माहिती द्यावी. त्याच्या बोलण्यामध्ये नजीकच्या काळात एखादी व्यक्ती, काम किंवा कृती यांचा प्रभाव जाणवला असल्यास तेही नमूद करावे. त्याच्याशी शेवटचा प्रत्यक्ष संपर्क झाला असतांना त्याची असलेली मनःस्थिती महत्त्वाची असते. नुकत्याच घडलेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या संदर्भात त्यांच्या पत्नीने दिलेली साक्ष अन्वेषणाला दिशा देणारी ठरली.

६. साहित्याची चोरी झाल्यास तक्रार कशी करावी ?

अ. चोरी, जबरीची चोरी, दरोडा अशा गुन्ह्यांची तक्रार देतांना आपण गुन्हेगारांना पाहिले असल्यास किंवा त्यांच्याविषयी पूर्वमाहिती असल्यास त्याची माहिती द्यावी. त्या वेळी गुन्हेगारांनी वापरलेल्या शस्त्रांचे वर्णनही सांगावे.

आ. गुन्हेगारांची एकूण संख्या, त्यांची वेशभूषा, चेहरेपट्टी, अंगकाठी आदींचे वर्णन सांगावे. त्यांचे आपसांत संभाषण झाले असल्यास त्यातील शब्द पोलिसांना सांगू शकतो. गुन्हेगारांनी भ्रमणभाष संच वापरलेला असल्यास तसे सांगावे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे वर्णन व्यवस्थित करावे.

इ. वाहन किंवा दागिने यांची चोरी झाल्यास त्यांच्या खरेदी पावत्या पोलिसांना सादर कराव्यात. त्यामुळे गुन्हेगार पकडल्यावर माल मिळाला, तर कायदेशीर प्रक्रियेत अडचण येत नाही. गुन्हेगाराला पाहिले असल्यास ‘त्याला परत पाहिल्यास ओळखू शकेन’, असे सांगावे.

७. तक्रार प्रविष्ट करतांना लक्षात ठेवायच्या महत्त्वपूर्ण गोष्टी !

अ. आपला जबाब व्यवस्थित वाचून पहावा. तो आपल्याला समजेल, अशाच भाषेत नोंदवलेला असावा. आपण सांगितलेली सर्व माहिती व्यवस्थित नोंदवलेली असल्याची निश्चिती झाल्यानंतरच साक्षीच्या खाली उजव्या बाजूला आपली स्वाक्षरी करावी. साक्ष नोंदवणार्‍या अधिकार्‍याची स्वाक्षरी आणि त्यांचे पदनाम डाव्या बाजूला लिहिले जाते. अधिकार्‍याची स्वाक्षरी झाल्यानंतर पोलीस त्याची प्रत आपल्याला विनामूल्य देतात. न दिल्यास प्रत मागून घ्यावी.

आ. आपण प्रविष्ट केलेल्या तक्रारीनंतर गुन्ह्याचे अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍याचे नाव, पदनाम, संपर्क क्रमांक याची माहिती पोलीस ठाण्यातून घ्यावी. अन्वेषणामध्ये वेळोवेळी झालेली प्रगती आणि सद्यःस्थिती यांची माहिती घेण्याचा अधिकार तक्रारदाराला आहे. आपला संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी त्यांना देऊ शकतो. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांची नावे, तसेच संपर्क क्रमांक आपण मागून घ्यावेत.

इ. गुन्ह्याच्या संदर्भात आपल्याला नंतर काही माहिती मिळाल्यास अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍याला कळवावी. आपल्याला किरकोळ वाटणारे एखादे सूत्र अन्वेषणाला गती आणि दिशा देऊ शकते. आपले पूर्वीचे वैमनस्य असल्यास, मालमत्तेवरून विकोपाचा वाद असल्यास, आपल्याला गुन्हेगारांकडून अपाय होण्याची भीती असल्यास संबंधित पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक यांना लेखी पत्र द्यावे आणि त्यांच्याकडे संरक्षणाची मागणी करावी.

ई. गंभीर प्रकरणामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांना लेखी पत्र देऊन त्याच्या प्रतीलिपी (कॉपी) पोलीस ठाणे, आयुक्त किंवा अधीक्षक यांना द्याव्यात.’

– एक माजी पोलीस अधिकारी

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे चांगले आणि कटू अनुभव कळवा !

पोलीस-प्रशासन यांच्याविषयी आलेले चांगले आणि कटू अनुभव पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल : [email protected]