गोवा विधानसभेच्या वर्ष २०२२ मध्ये होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय घडामोडी
विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावून ‘तृणमूल काँग्रेस’ने स्वतःचा रंग दाखवायला प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल !
मडगाव, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात प्रवेश केलेला बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्ष प्रसिद्धीसाठी राज्यात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फलक लावत आहे. अशाच प्रकारे तृणमूल काँग्रेसच्या वतीने सावर्डे येथे एका ‘एजन्सी’च्या माध्यमातून विनाअनुज्ञप्ती ६ ऑक्टोबरला उत्तररात्री २ वाजता कापडी फलक, भित्तीपत्रके लावली जात होती. यासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे छायाचित्र असलेले १ टेंपो वाहन भरून प्रसार साहित्य आणण्यात आले होते. स्थानिक लोकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर लोकांनी त्यांना अडवून सर्व फलक काढण्यास भाग पाडले.
सावर्डे पंचायत क्षेत्रात फलक लावण्यासाठी परप्रांतीय कामगार आणण्यात आले होते. सावर्डे येथील तिस्क परिसरात फलक लावले जात असतांना स्थानिकांनी फलक लावणार्यांकडे स्थानिक पंचायतीची अनुज्ञप्ती दाखवण्याची मागणी केली. या वेळी एकाही कामगाराला स्थानिक कोकणी किंवा मराठी भाषा येत नव्हती. स्थानिकांनी ‘एजन्सी’च्या प्रतिनिधीला सावर्डे येथे बोलावून घेतले. ‘‘तृणमूल काँग्रेस’चे फलक लावण्यासाठी पंचायतीकडून अनुज्ञप्ती घेतली नाही’, असे त्या प्रतिनिधीने या वेळी स्पष्ट केले.
गोव्यात निवडणूकपूर्व सर्वेक्षण वातानुकूलीन खोलीत बसून हातात मद्याचा पेला घेऊन केले जाते ! – उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा आरोप
काणकोण, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात निवडणूकपूर्व सर्वेक्षण वातानुकूलीन खोलीत बसून हातात मद्याचा पेला घेऊन केले जाते, असा गंभीर आरोप गोवा विधानसभेचे उपसभापती तथा भाजपचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी केला. गोव्यातील एका वृत्तवाहिनीने नुकतेच आगामी विधानसभा निवडणुकीचे निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले आणि या सर्वेक्षणात आगामी निवडणुकीत आमदार इजिदोर फर्नांडिस निवडून येण्याची शक्यता अल्प असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी हा आरोप केला. वर्ष २०१९ मध्ये काँग्रेसमधील १० आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आणि या १० आमदारांमध्ये उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचाही समावेश आहे.