सिंधुदुर्ग – जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव झाल्यानंतर आता ७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात ११७ ठिकाणी सार्वजनिक, तर ३४ ठिकाणी खासगी, अशा एकूण १५१ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. नवरात्रोत्सव आणि दसरा हे सण शांततेत आणि सुरळीत साजरे व्हावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग अल्प झाला असला, तरी धोका पूर्णत: गेलेला नाही. त्यामुळे जिल्हावासियांनी कोरोनाविषयीचे नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नवरात्रोत्सवात दांडिया, रास-गरबा यांवर बंधने असतील.
दोडामार्ग पोलिसांकडून नवरात्रोत्सवात महिलांसाठी मार्गदर्शन
दोडामार्ग तालुक्यात ७ ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी पोलिसांकडून मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक आर्.जी. नदाफ या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण, बाल लैंगिक शोषण, महिला आत्मसंरक्षण, अत्याचार प्रतिबंध आणि सुदृढ आरोग्य यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.