माहिम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्तींच्या गायब होण्याच्या प्रकरणात विश्वस्तांची भूमिका संशयास्पद !

  • धर्मादाय आयुक्तांनी व्यक्त केली मूर्तींच्या विक्रीची शक्यता

  • मूर्तींचे मूल्यांकन उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून गुन्हा नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

हिंदूंच्या प्राचीन मंदिरातील पुरातन मूर्तींच्या चोरीच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या संदर्भात अशीच भूमिका घेतील का ? – संपादक 

माहिम येथील जागृत देवस्थान काशी विश्वेश्वर मंदिर

मुंबई, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – माहिम येथील जागृत देवस्थान आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिरातील २३६ वर्षांपूर्वीच्या देवतांच्या मूर्ती गायब झाल्याचे नुकतेच उघड झाले होते. याविषयी धर्मादाय आयुक्तांनी मंदिराच्या विश्वस्तांविषयी गंभीर मते नोंदवली आहेत. या प्राचीन मूर्तींची विक्री झाल्याची शक्यताही धर्मादाय आयुक्तांकडून व्यक्त करण्यात आली होती. यावर विश्वस्तांनी अद्यापही भूमिका स्पष्ट न केल्यामुळे ‘मंदिरातील पुरातन मूर्तींची विक्री करण्यात आली आहे का ?’ असा संशय भाविकांमध्ये निर्माण झाला आहे. दुसरीकडे या मूर्तींचे मूल्यांकन उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. या प्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून प्राचीन मूर्तींचे निरीक्षण करून पंचनामा करण्यात आला असून विश्वस्तांचा जबाब नोंदवून चौकशी अहवालही सादर करण्यात आला आहे. या चौकशी अहवालात धर्मादाय आयुक्तांनी विश्वस्तांविषयी गंभीर मते नोंदवली आहेत.

गुन्हा नोंद न करणे, हा हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ ! – प्रसाद ठाकूर, भाविक (तक्रारकर्ते)

पुरातत्व विभागाकडे मूर्तींची नोंद नसली, तसेच त्यांचे मूल्यांकन नसले; म्हणून गुन्हा नोंद न करणे, हा पोलिसांचा टाळाटाळ करण्याचा प्रकार आहे. काशी विश्वेश्वर मंदिर हे २३६ वर्षांपूर्वीचे आहे. कोणतेही मंदिर हे देवाविना नसते. देशात लाखो मंदिरे आहेत. त्यांतील सर्व मूर्तींचे मूल्यांकन झालेच असेल, असे नाही; म्हणून या प्रकरणी गुन्हा नोंद होणार नाही का ? हा केवळ चोरीचा गुन्हा नाही, तर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचाही प्रकार आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद न होणे, हा हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ आहे.

मूर्तींचे मूल्यांकन नसल्यामुळे अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही ! – विलास शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माहिम पोलीस ठाणे

या प्रकरणी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे म्हणाले, ‘‘या प्रकाराचे अन्वेषण पोलिसांकडून चालू आहे; मात्र गुन्हा नोंदवतांना चोरी झालेल्या वस्तूंचे मूल्यांकन आवश्यक आहे. मूर्तींचे मूल्यांकन मिळावे, यासाठी पुरातत्व विभागाला पत्र पाठवले होते; मात्र त्यांच्याकडे मूर्तींची नोंद नाही. आता आम्ही मूल्यांकनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पुरातत्व विभागाला पत्र पाठवले आहे.’’

पोलिसांनी कारवाई न केल्यास मोठे आंदोलन करू ! – नीलेश चव्हाण, माजी नगरसेवक, मनसे

काशी विश्वेश्वर मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारका’चा दर्जा असतांना धर्मादाय आयुक्तांना विश्वासात न घेता परस्पर मूर्ती पालटण्याचा विश्वस्तांचा कारभार संशयास्पद वाटतो. मूर्ती प्राचीन असल्यामुळे त्यांचे लेपनही करता आले असते. पालटलेल्या मूर्ती ‘फार्म हाऊस’मध्ये नेण्याचे कारण काय ? या प्रकरणाचे अन्वेषण करण्यास पोलीस दिरंगाई करत आहेत. पोलीस मूर्तींचे मूल्यांकन नंतरही करू शकतात. एखाद्या मंदिरात सोन्याच्या वस्तूची चोरी झाली, तर पोलीस मूल्याकंन करत बसणार कि चोरीला गेलेल्या वस्तूचा शोध घेणार ? पोलिसांनी प्रकरणी कारवाई केली नाही, तर आम्ही मोठे आंदोलन करू, अशी चेतावणी मनसेचे माजी नगरसेवक नीलेश चव्हाण यांनी दिली.

विश्वस्तांकडून स्पष्टीकरणाविषयी दिरंगाई का ?

धर्मादाय आयुक्तांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात या प्रकरणात स्पष्टपणे मंदिराच्या विश्वस्तांना दोषी ठरवले आहे. यामध्ये ‘काशी विश्वेश्वर मंदिराचा समावेश राज्य संरक्षित स्मारकामध्ये होऊनही मूर्तींच्या जीर्णाेद्धाराची शासकीय कार्यपद्धत डावलून परस्पर मूर्ती पालटणे, मूर्तींच्या विसर्जनाचा कोणताही पुरावा सादर न करणे, विश्वस्तांच्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये फेरफार करणे, अहवालावर विश्वस्तांच्या स्वाक्षर्‍या चिकटवणे, मंदिरातील कासवाची मूर्ती पालटली नसल्याची खोटी माहिती देणे’, अशा अनेक गंभीर आरोपांचा समावेश आहे. तथापि यातील एकाही आरोपाविषयी मंदिराच्या विश्वस्तांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे स्पष्टीकरण देण्यासाठी विश्वस्तांकडून दिरंगाई का होत आहे?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आरोपांवर प्रतिक्रिया देणे उचित नाही ! – सतीश परळकर, विश्वस्त

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना त्यावर भाष्य करणे आम्हाला अडचणीचे ठरेल. असे करणे, हे न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याचे मानले जाईल. आमचे अधिवक्ता जो सल्ला आम्हाला देतील, त्यानुसार आम्ही कार्यवाही करू. मंदिराविषयी वृत्तांत ऐकून भाविक व्यथित झाले आहेत. तक्रारदाराने केलेल्या आरोपांवर आम्ही काहीही वक्तव्य करणे उचित नाही. पोलिसांनी या घटनेची पूर्ण चौकशी केली असून तक्रारीत नोंद घेण्यासारखे काही नसल्याचे कळवले आहे. पोलीस, धर्मादाय आयुक्त आणि भारतीय न्यायसंस्था यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

वरील स्पष्टीकरण मंदिराचे विश्वस्त सतीश परळकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला ‘व्हॉट्सॲप’द्वारे पाठवले; मात्र विश्वस्तांची ही भूमिका देवस्थानच्या ‘लेटरहेड’वर पाठवण्यात आलेली नाही.

भाविकांकडून उपस्थित झालेल्या प्रश्नांविषयी विश्वस्तांकडून स्पष्टीकरण नाही !

या प्रकरणात भाविकांकडून उपस्थित करण्यात आलेले खालील प्रश्न दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने मंदिराचे विश्वस्त सतीश परळकर यांना ‘व्हॉट्सॲप’वर पाठवले.

१. मंदिराला ‘हेरिटेज’चा दर्जा असतांना मूर्तींचा जीर्णाेद्धार करण्याविषयी धर्मादाय आयुक्तांना सूचित का करण्यात आले नाही ?

२. शिवलिंग कुठे विसर्जित केले ? त्याचा तपशील धर्मादाय आयुक्तांकडे का सादर केला नाही ?

३. श्री पावतीदेवी आणि श्री शितलादेवी यांच्या मूर्ती भट्टे यांच्या ‘फार्म हाऊस’वर का ठेवण्यात आल्या ?

४. शिवलिंग विसर्जनाचे दायित्व विश्वस्त नसलेल्या श्री. कुलकर्णी यांच्याकडे देण्यामागचे कारण काय ?

५. इतिवृत्तामध्ये खाडाखोड का केली आहे ?

वरील प्रश्नांविषयी सतीश परळकर यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण प्राप्त झालेले नाही. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सतीश परळकर यांना २ – ३ वेळा संपर्क केला; मात्र त्यांनी दूरभाष उचलला नाही. त्यामुळे वरील प्रश्नांविषयी विश्वस्तांची भूमिका कळू शकली नाही.

गुन्हा नोंदवून पोलिसांनी प्रकरणाचे अन्वेषण करावे ! – आमदार सदा सरवणकर, शिवसेना, माहिम विधानसभा क्षेत्र

आमदार सदा सरवणकर

या प्रकरणाची माहिती माझ्यापर्यंत अद्याप आलेली नाही; मात्र मूर्तींची चोरी झाली असेल, तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण करायला हवे. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांनी याविषयाची माहिती दिल्यास या प्रकरणी मी लक्ष घालीन, असे शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराशी बोलतांना सांगितले. (काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब होण्याचा प्रकार गंभीर असल्याने ही धर्महानी रोखण्यासाठी हिंदु लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)

गुन्हा नोंदवण्यास नकार देणार्‍या पोलिसांनी कायद्याचा अभ्यास करावा ! – अधिवक्ता सुनीता खंडाळे, मुंबई उच्च न्यायालय

अधिवक्ता सुनीता खंडाळे

या सर्व विषयातील माहिती घेतल्यावर मला असे वाटते की, जे पोलीस अधिकारी या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास ‘नाही’ म्हणत आहेत, त्यांनी भा.दं.वि.च्या कलम ३७८ मधील चोरीची व्याख्या आणि अन्य संबंधित कायदे वाचणे आवश्यक आहे. यापूर्वीही अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी जाणूनबुजून भाविकांच्या सहनशीलतेची परीक्षा बघण्याचे प्रकार पोलिसांकडून घडलेले आहेत. पोलिसांची अशीच भूमिका राहिल्यामुळे येत्या काळात मोठी अनपेक्षित घटना घडल्यास त्यास उत्तरदायी कोण असेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.