मालवण – कोरोना महामारीमुळे बंद असलेली धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे मंदिर ७ ऑक्टोबरऐवजी २५ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी उघडण्यात येणार आहे. प्रतिवर्षी आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर घटस्थापनेच्या वेळी बंद ठेवले जाते. यावर्षी ७ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मंदिर बंद असणार आहे. या कालावधीत मंदिरातील धार्मिक विधी होणार आहेत; मात्र नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे आदी विधी बंद रहाणार आहेत. २५ ऑक्टोबरपासून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.