कर्नाटकचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते के.आर्. रमेश कुमार यांचा दावा !
|
बेंगळुरू (कर्नाटक) – जर भारतात इस्लाम तलवारीच्या बळावर पसरला असता, तर आज देशात एकही हिंदू राहिला नसता; कारण मुसलमानांनी भारतावर ८०० वर्षे राज्य केले, असा दावा कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार के.आर्. रमेश कुमार यांनी केला आहे. ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस्.वाय. कुरेशी यांचे पुस्तक ‘द पॉप्युलेशन मिथ’ (लोकसंख्येसंदर्भातील दंतकथा) याच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. ‘धार्मिक शक्ती देशाच्या राज्यघटनेला कमकुवत करत आहेत’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
१. रमेश कुमार पुढे म्हणाले की, इस्लाम तलवारीच्या बळावर पसरवल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. (याला ऐतिहासिक आधार नाही, हे रमेश कुमार कोणत्या आधारे सांगत आहेत, हे त्यांनी प्रथम स्पष्ट केले पाहिजे ! भारतातील कोणत्याही हिंदूने त्या काळी स्वतःहून स्वच्छेने मुसलमान धर्म स्वीकारल्याचाही इतिहास नाही, हे रमेश कुमार का मान्य करत नाहीत कि काँग्रेसवाल्यांना मुसलमानांच्या मतांसाठी इतिहासही खोटा ठरवायचा आहे ? – संपादक) या मुसलमान शासकांचा इतिहास आणि त्यांचे देशातील विकासासाठीचे योगदान यांना विकृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (मुसलमान शासकांनी देशात कोणता विकास केला, हे रमेश कुमार यांनी पुराव्यासह दाखवून द्यावे ! – संपादक) मुसलमानांनी या देशासाठी जे काही योगदान दिले आहे, ते लोकांच्या डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. (ज्या देशभक्त मुसलमानांनी भारतासाठी योगदान दिले आहे, उदा. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना कुणीही विसरणार नाही; मात्र ज्यांनी काहीच केले नाही आणि त्याचा उदोउदो केला जात आहे, त्याची वस्तूस्थिती देशाला सांगितली गेलीच पाहिजे ! – संपादक) ऐतिहासिक गोष्टींना चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे. त्यातूनच ‘मुसलमानांनी बलपूर्वक इस्लामचा प्रसार केला’, असे सांगितले जात आहे. (उत्तरप्रदेशात, तसेच देशातील अन्य राज्यांतही धर्मांधांकडून सहस्रावधी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे उघड होत असतांना रमेश कुमार त्यावर मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)
२. या वेळी कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. एच्.सी. महदेवप्पा यांनीही रमेश कुमार यांची री ओढत ‘मुसलमान शासकांनी बलपूर्वक धर्मांतर करण्यास भाग पाडल्याला ऐतिहासिक आधार नाही’, असा दावा केला. ते म्हणाले की, मुसलमानांनी या देशावर ८०० वर्षे, तर इंग्रजांनी २०० वर्षे राज्य केले; मात्र या काळात त्यांनी भारताला ‘इस्लामी’ किंवा ‘ख्रिस्ती’ देश घोषित करण्याचा प्रयत्न केला नाही. (हिंदूंच्या शक्तीमुळेच त्यांना तसे करण्याचे धाडस झाले नाही अन्यथा त्यांनी ते केलेच असते ! काँग्रेसच्या राज्यात मात्र ईशान्य भारतातील काही राज्ये आज ख्रिस्तीबहुल झाली आहेत आणि ती स्वतंत्र ख्रिस्ती देशाची मागणी करत आहेत, याविषयी महादेवप्पा का बोलत नाहीत ? – संपादक) देशात धर्मांध शक्तींची सत्ता आल्यावर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्याचे म्हटले जात आहे. अशा शक्तींना प्रभावीपणे उत्तर देऊन त्यांचा हेतू अयशस्वी केला पाहिजे.