देवगड – तालुक्यातील गिर्ये येथील समुद्रात चीनची ‘व्ही.टी.एस्.’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) यंत्रणा असलेली बोट सापडली आहे; मात्र ही बोट रत्नागिरी येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी बोट देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या कह्यात देण्यात आली आहे. चीनची यंत्रणा बसवलेली बोट सापडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या; मात्र चौकशीअंती ही बोट भारतीय असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या बोटीसमवेत असलेल्या अन्य २ नौका घेऊन खलाशी पळून गेले.
गिर्ये येथील समुद्रात चिनी बनावटीच्या बोटी असल्याचे ‘कोस्टगार्ड’ला ‘जी.पी.एस्.’ यंत्रणेवर समजले. गेले २ – ३ दिवस या बोटी असल्याचे समजल्यानंतर तात्काळ याची माहिती मत्स्यव्यवसाय विभाग आणि पोलीस यांना देण्यात आली. मत्स्यव्यवसाय विभागाकडे गस्तीनौका नसल्याने सागरी पोलीस विभागाला बोटीचा शोध घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सागरी पोलीस विभागाचे पथक गस्तीनौकेने समुद्रात गेले.
या पथकाला ३ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता गिर्ये येथील पवनचक्कीसमोरील समुद्रात ११.५ समुद्री अंतरावर (नॉटीकल मैल) चिनी ‘व्ही.टी.एस्.’ यंत्रणा असलेली रत्नागिरी येथील दाऊद इब्राहीम साखरकर यांची ही बोट सापडली. या बोटीसमवेत असलेल्या अन्य २ नौका घेऊन खलाशी पळून गेले.
पकडलेली बोट पोलिसांनी देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या कह्यात दिली. या बोटीवर बसवण्यात आलेल्या ‘व्ही.टी.एस्.’ यंत्रणेची भारतात नोंदणी करण्यात आली नसल्याने ही बोट चीनमधील असल्याचे ‘जी.पी.एस्.’ यंत्रणेवर दिसत होते. अधिक चौकशीनंतर नौका भारतीय असल्याचे निष्पन्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बोटीच्या माध्यमातून नियमबाह्य कृती करण्यात आल्याने तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या सूत्रांनी दिली.